लेख : मुद्दा : गदिमांचे नाट्यगृह जन्मशताब्दी वर्षातच व्हावे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सादिक खाटीक

थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे भव्य नाट्यगृह उभारण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून 13 कोटी 63 लाख रुपये मंजूर केले आहेत. आमदार अनिल बाबर यांनी गेल्या महिन्यात आटपाडी येथे तसे जाहीर केले. गदिमांचे जन्मगाव शेटफळ याबरोबरच माडगुळे, आटपाडी, पुणे येथेही स्मारके उभारली जावीत अशी पूर्वीपासून मागणी आहे. शेटफळे येथे 1 कोटी खर्चाचे स्मारक उभारले गेले. राज्याचे तत्कालीन अर्थ व नियोजन मंत्री जयंत पाटील यांनी गदिमा स्मारकासाठी प्रथम बजेट तरतूद केली होती. तथापि शेटफळे येथील स्मारक परिपूर्ण होण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. शेटफळेबरोबरच माडगुळे, आटपाडी, आणि पुणे येथे या जन्मशताब्दी वर्षात स्मारक उभारण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्या पार्श्वभूमीवर शासनाने 14 कोटी रुपये खर्चाच्या आटपाडीतील नाट्यगृह उभारणीला मंजुरी देऊन गदिमांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांनी बारामतीत सात कोटी खर्चाचे आणि दोन हजार लोक बसतील अशा क्षमतेचे गदिमांच्या नावाचे राज्यातील पहिले भव्य सभागृह 2003 मध्ये उभारून कृतिशील स्मृती जतन केली आहे. तसेच 2016 मध्ये पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने सुमारे 40 कोटी रुपये खर्चाचे गदिमा नाट्यमंदिर उभारून गदिमांविषयी विशेष आस्था प्रकट केली होती. राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेकडूनदेखील पुण्यात गदिमा स्मारक उभारणीच्या हालचाली सुरू आहेत.

आटपाडी गावठाणातल्या सरकार वाडय़ातील विविध शासकीय कार्यालयाच्या जुन्या इमारतींसह तेथील मोकळ्या सुमारे दोन एकर जागेमध्ये गदिमांच्या नावे बहुउद्देशीय संकुल उभारावे. त्यामध्ये पाच हजार लोक बसू शकतील असे सभागृह साकारावे किंवा 90 मीटर रुंदीच्या आटपाडीच्या विस्तीर्ण ओढा पात्राच्या मोकळ्या जागेत हे संकुल उभारले जावे म्हणून यापूर्वी जुलै 2018 मध्ये आपण आवाज उठविला होता. 2 ऑगस्ट 2018 रोजी आटपाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आटपाडीत गदिमा संकुल उभारणी संदर्भातला ठराव मंजूर झाला होता.

1 ऑक्टोबर 2018 या जयंतीदिनापासून गदिमांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. या जन्मशताब्दी वर्षात गदिमांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण हा सन्मान देऊन गौरवावे. यासाठी सर्वच पक्षांनी साथ द्यावी अशी मागणीही मी वेळोवेळी केली आहे. 14 डिसेंबर 2018 या गदिमांच्या 40 व्या स्मृतीदिनी शेटफळे येथील स्मारकाला परिपूर्णता द्यावी. माडगुळे, आटपाडी आणि पुणे येथील गदिमां स्मारकासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा. आटपाडी येथे बहुउद्देशीय गदिमा संकुलात पाच हजार लोक बसतील असे सभागृह असावे. शेटफळे येथील गदिमा स्मारकाला 15 वर्षे होऊन गेली. मात्र अद्याप त्याला परिपूर्णता आलेली नाही हे लक्षात घेऊन आटपाडीत गदिमा नाट्यगृहासाठी मंजूर झालेले 14 कोटी रुपये 1 ऑक्टोबर 2019 पूर्वी म्हणजे गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातच खर्च करून हे नाट्यगृह उभारावे आणि त्याचे उद्घाटनदेखील जन्मशताब्दी समारोपदिनीच होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.