
सामना ऑनलाईन । अलाहाबाद
विटी दांडू खेळताना विटी उडवणाऱ्या मुलाच्या हातातील दांडूचा दणका बसल्याने अलाहाबादमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मोहम्मद जमाल असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जमालच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुलादाबाद पोलीस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. खेळातील दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अलाहाबादच्या चक निरातुल या गावात रविवारी ही घटना घडली.
मोहम्मद जमाल हा काही मित्रांसोबत रविवारी विटी-दांडू खेळत होता. त्यांच्यासोबत एक 14 वर्षांचा मुलगाही होता. हा मुलगा विटी उडवण्यासाठी दांडू घेऊन उभा होता. विटी झेलण्यासाठी मोहम्मद त्याच्या मागेच उभा होता. 14 वर्षांच्या मुलाने विटी उडवल्यावर त्यांच्या हातातील दांडूचा दणका मोहम्मदच्या डोक्यात बसला. या धक्क्याने तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
जमालच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. खेळातील दुर्लक्षामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. अहवाल आल्यानंतरच या घटनेतील आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील असे पोलिसांनी सांगितले.

























































