
सामना ऑनलाईन, मुंबई
पवई येथील आयआयटी मुंबईतील कॅण्टीनमधील जेवणातून 25 विद्यार्थिनींना रविवारी विषबाधा झाली. जेवणात देण्यात आलेल्या दुधी हलव्यामुळे ही विषबाधा झाल्याचे नंतर उघड झाले. पोटदुखी आणि उलटय़ा होऊ लागल्याने या विद्यार्थिनींना तातडीने संस्थेच्या आवारातील रुग्णालयात नेऊन उपचार देण्यात आल्याने अनर्थ टळला.
आयआयटी मुंबईतील एच-10 या मुलींच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. तेथील कॅण्टीनमध्ये रविवारी जेवणामध्ये दुधी हलवा देण्यात आला होता. जेवून झाल्यानंतर विद्यार्थिनी आपल्या खोलीमध्ये गेल्या. काही वेळाने अनेकींना अस्वस्थ वाटू लागले. पोटात दुखू लागले आणि उलटय़ा होऊ लागल्या. हा प्रकार तातडीने वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आला. त्यांनी त्या विद्यार्थिनींना आयआयटीतील रुग्णालयात नेले. तिथे उपचारानंतर मुलींना बरे वाटले.
सावधगिरी म्हणून वसतिगृहातील सर्व मुलींना काही त्रास होतोय का याबाबत विचारपूस केली गेली. या घटनेनंतर स्वच्छतेसाठी कॅण्टीन दोन दिवस बंद ठेवण्यात आली. त्याबाबत विद्यार्थिनींना प्रशासनाने ई-मेल पाठवून कळवले आहे.





























































