
सामना प्रतिनिधी । मुंबई
पादचाऱ्यांच्या हातातले मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा चोरांना एका कॉन्स्टेबलचा मोबाईल चोरणे महागात पडले. चोराने मोबाईल हिसकावला, पण दक्ष कॉन्स्टेबलने त्याचा हात पकडल्यामुळे दुचाकीवर असलेले दोघे चोर रस्त्यावर आडवे झाले आणि पकडले गेले.
पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममध्ये कार्यरत असलेले महेश जुनगारे (25) यांना पुण्याला जायचे असल्याने ते रविवारी सकाळी दादर टी. टी. येथे गाडीची वाट बघत उभे होते. ते मोबाईलमध्ये बघत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या व मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल हाती येताच दोघेही पळून जाणार तेवढ्यात महेश यांनी मागे बसलेल्या तरुणाला पकडले. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर आडवे पडले. मग नागरिकांनी त्यांना पकडून 100 नंबरवर संपर्क साधला व घडलेल्या घटनेची माहिती दिली. हा प्रकार कळताच माटुंगा पोलीस ठाण्याचे एपीआय विजय अंबरगे, उपनिरीक्षक गावित यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोहम्मद शकील रफिक शेख (22) आणि नासिर असिफ हुसेन शेख या दोघांना पकडले.


























































