
सामना प्रतिनिधी, मालवण
शेकडो वर्षांची परंपरा जोपासत ‘देवपळण’निमित्ताने सोमवारी पहाटे वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ गावाच्या वेशीबाहेर निघाले. त्यानंतर दुपारपर्यंत 1800 लोकवस्तीचा संपूर्ण गावही रिकामी झाला.
कोकणची एक आगळीवेगळी प्रथा म्हणजे देवपळण-गावपळण. गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव दर तीन वर्षांनी तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी खाली होतो. त्यानुसार सर्व संसार गावाच्या वेशीबाहेर वसले आहेत. मालवण तालुक्यातील वायंगणी गावात ही प्रथा शेकडो वर्षांपासून जोपासली जात आहे. वायंगणीलगत असलेल्या आचरा आणि चिंदर या दोन गावांत तीन वर्षांनी गावपळण होते. मात्र वायंगणी गावात देवपळण आणि गावपळण अशी प्रथा जोपासली जाते. प्रथेनुसार ग्रामदेवतेचा कौल घेऊनच या गावपळणीची तारीख निश्चित झाली होती. तीन दिवसांनंतर गुरुवारी देवाचा कौल घेऊनच पुन्हा गावात प्रवेश केला जाणार आहे. तीन दिवसांसाठी गावच वेशीबाहेर गेल्याने गावातील शाळा, शासकीय कार्यालयाचे कामकाजही ठप्प राहणार आहे. घरादारांसह सर्व रस्तेही सुनेसुने झाले आहेत.
तीन दिवसांसाठी पुरेल एवढा धान्यसाठा व अन्य साहित्य गोळा करून जणू नव्या घराचीच तयारी करण्यात आली आहे. माणसांबरोबर पाळीव प्राण्यांनाही आपल्या सोबतीला आणले आहे. धार्मिक प्रथा जोपासताना उत्साह व आनंदात तीन दिवस मौजमजाही होते.
राहुट्या बांधण्याचे काम
वायंगणीचे ग्रामदैवत रवळनाथ चिंदर सडेवाडी येथे प्रथेप्रमाणे तीन दिवसांसाठी मुक्काम करतो. त्यालगतच ग्रामस्थ मंडळीही राहुटय़ा बांधून तसेच मित्रपरिवारांच्या घरात वास्तव्यास राहतात. मालवण- आचरा मार्गावरील कालावल पुलाखाली किनाऱ्यालगत राहुट्या बांधण्याचे काम सुरू आहे.
























































