न्यूझीलंडमध्ये ‘गोरा’ दहशतवाद; हिंदुस्थानी ‘आक्रमकां’ना युरोपातून हुसकावून लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ख्राइस्टचर्च

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींमध्ये घुसून झालेला बेछूट गोळीबार हा ‘गोरा दहशतवाद’ आहे. माथेफिरू शूटर ब्रेंटन टॅरेंट हा वर्णद्वेशी आणि स्वयंघोषित ‘जातीय राष्ट्रवादी’ आहे. त्याच्यावर ‘निओ-नाझी’ विचारांचा पगडा आहे. हिंदुस्थानी नागरिक हे ‘आक्रमक’ आहेत. त्यांना युरोपातून हुसकावून लावणार असा ब्रेंटनचा ‘जाहीरनामा’च आहे. त्यासाठीच त्याने हत्याकांड केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

28 वर्षीय माथेफिरू ब्रेंटन टॅरेंटने ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी नमाजावेळी बेछूट गोळीबार केला. त्यात 49 जणांचा मृत्यू झाला तर 20  जण गंभीर जखमी झाले. या भयंकर हल्ल्यामागे निर्वासितांविरुद्धचा द्वेष असल्याची शक्यता सुरुवातीला सांगण्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॉसिंडा आर्डर्न यांनी व्यक्त केली होती, मात्र यापेक्षाही भयंकर कट उघडकीस आला आहे.

काय आहे माथेफिरूचा ‘जाहीरनामा’

  • माथेफिरू हल्लेखोर ब्रेंटन टॅरेंटने गोळीबाराचे ‘फेसबुक लाइव्ह’ केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. टॅरेंटने हल्ल्यापूर्वी ऑनलाइन मॅनीफिस्टो (जाहीरनामा) प्रसिद्ध केला होता. 74 पानी हा जाहीरनामा हिंदुस्थानींची चिंता वाढविणारा आहे.
  • हिंदुस्थानसह चीन आणि टर्की हे तीन देश पूर्व भागातील शत्रू राष्ट्र आहेत.
  • युरोपियन देशांमध्ये असलेले हिंदुस्थानी हे आक्रमक आहेत. या आक्रमकांना युरोपातून हुसकावून लावले पाहिजे. तसेच चीन, टर्की, रोम, आफ्रिकन देशातील नागरिकांनाही हाकलले पाहिजे असे माथेफिरू टॅरेंटने या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
  •  फ्रेंच लेखक रिनाऊड कॅम्युस यांच्या ‘आयडिया ऑफ व्हाइट जिनोसाइड’चा उल्लेख यात आहे. दोन वर्षांपासून या हल्ल्याचा कट सुरू होता असे माथेफिरूने यात म्हटले आहे. टॅरेंट हा वर्णद्वेष आणि इथनो नॅशनॅलिस्ट (जातीय राष्ट्रवादी) आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आदर्श

या जाहीरनाम्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपले आदर्श असल्याचे माथेफिरूने म्हटले आहे. ट्रम्प हे ‘व्हाइट आयडेंटेटीचे’ प्रतीक आहेत. त्यांना पाठिंबा आहे असाही उल्लेख या जाहीरनाम्यात केला आहे.

सात हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता

न्यूझीलंडमध्ये मशिदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन हिंदुस्थानींचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद येथील फराज हसन आणि मुसा वली सुलेमान पटेल यांचा मृत्यू झाला. फराज हे इंजिनीअर होते. सात हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता आहेत. या वृत्ताला हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयाने दुजोरा दिला आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त हिंदुस्थानी वंशाचे नागरिक राहतात. त्यात तब्बल 30 हजार विद्यार्थी आहेत.