Holi 2019 मुंबईत धुळवड उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

 ‘होळी रे होळी… पुरणाची पोळी…’ असे म्हणत दहशतवादाच्या राक्षसासह दुष्प्रवृत्तींचे दहन करून होळीचा सण बुधवारी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा झाला. त्यानंतर आज धुळवडीच्या विविधरंगी रंगांमध्ये मुंबईकर रंगून गेले. मुंबईतील सोसायटय़ा, मैदाने आणि चौपाटय़ांवर एकमेकांना रंग लावत आबालवृद्धांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. तरुणाई तर होळीच्या रंगांमध्ये न्हाऊन गेली होती.

बुधवारी रात्री होळी पेटल्यानंतरच खऱ्या अर्थाने रंग उधळण्यास सुरुवात झाली होती. आज सकाळपासून त्याला अधिकच उधाण आले. सोसायटय़ांमध्ये बॅन्जोच्या तालावर रंगांची उधळण करत तरुणाई थिरकू लागली. रसायनयुक्त रंग टाळत यंदा तरुण पिढीने कोरडय़ा रंगांचा अधिक वापर केला होता. तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेल्या तरुण-तरुणींच्या टोळय़ा ठिकठिकाणी सेल्फी घेताना दिसत होत्या.

शिवाजी पार्क, गिरगाव व दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटीवर रंगपंचमीसाठी शेकडोंची गर्दी झाली होती. पार्ल्याच्या मिठीबाई महाविद्यालयात रेन डान्स आणि फोम डान्सच्या तालावर नाचत स्थानिकांनी धुळवड साजरी केली. काही ठिकाणी रंगपंचमीला गालबोट लागले. धुळवड साजरी करताना विविध घटनांमध्ये जखमी झालेल्या 13 जणांना उपचारासाठी जीटी आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गरीबांना पुरणपोळीचे दान

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘होळी लहान, पोळी दान’ या उपक्रमांतर्गत होळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरणपोळी जाळण्यापेक्षा ती गरीबांना द्या असे आवाहन केले होते. त्याला मुंबई-ठाण्यातील विविध मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सोसायटय़ांनी पुरणपोळ्या गोळा करून अंनिसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या. त्या पोळय़ा रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना वाटल्या गेल्या.

हुल्लडबाजीला दंडुका

मुंबईतील चौपाटय़ांवर रंगपंचमीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. त्या गर्दीत काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रंगांमध्ये रंगलेले तरुण मोटरसायकलींवरून हुल्लडबाजी करत हिंडतात असा अनुभव असल्याने नाक्यानाक्यांवर पोलीस तैनात होते. मोटरसायकलवरून ट्रीपल सीट फिरणाऱ्या अनेक हुल्लडबाजांना पोलिसांनी वठणीवर आणले. फुगे फेकणाऱ्यांवरही पोलिसांचे बारीक लक्ष होते.

दादर-ट्रॉम्बेमध्ये मतदार जागृतीची रंगपंचमी

देशभरात मोठय़ा उत्साहाने आणि आनंदाने रंगपंचमी साजरी केली जात असताना दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी अनोख्या पद्धतीने धुळवड साजरी केली. ‘नैसर्गिक रंगांचा वापर करून धुळवड जरूर साजरी करा, मात्र येत्या एप्रिल महिन्यात मतदानाच्या शाईचा रंग आपल्या बोटाला लावून लोकशाही मजबूत करा’ असा संदेश देत खासदार शेवाळे यांनी रंगपंचमी साजरी केली.

मुंबईत येत्या 29 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकशाहीला बळकटी देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी खासदार शेवाळे यांनी जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या रंगपंचमीच्या दिवशी ट्रॉम्बे ते दादरपर्यंत अनेक ठिकाणी खासदार राहुल शेवाळे नागरिकांच्या रंगपंचमीच्या आनंदात सहभागी झाले आणि शेवाळे यांनी त्यांचे प्रबोधनही केले.

धुळवडीच्या रंगांची 58 जणांना बाधा,इको फ्रेंडली होळीमुळे रुग्णांचे प्रमाण घटले

मुंबईत उत्साहात होळी साजरी झाली असताना काही ठिकाणी मात्र रंगाचा बेरंग झाला. रंगांची बाधा झाल्यामुळे तसेच अपघातामुळे मुंबईतील महापालिका तसेच सरकारी रुग्णालयांत 58 जणांवर उपचार करण्यात आले. यंदा होळी शिस्तीत आणि इको फ्रेंडली साजरी झाल्याने रंगबाधा तसेच अपघातामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे.

कानात रंग जाणे, त्कचेला खाज येणे, डोळे चुरचुरणे, घसा-नाकातील तक्रारी घेऊन 58 जणांनी रुग्णालये गाठली. यात लहान मुलांसह प्रौढांचाही समावेश होता. यापैकी अनेकांवर तत्काळ उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 27 जणांकर उपचार करुन सोडून देण्यात आल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. यात त्कचेची जळजळ, भांग प्यायल्याने धुंदी आणि एक रुग्ण अपघातामुळे दाखल करण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. यातील सर्वांकर उपचार करून सोडून देण्यात आले. तर नायर रुग्णालयात एकूण 13 जण दाखल करण्यात आले. यातील मेडिसीन किभगात 3, नेत्रचिकित्सा किभागात 2, सर्जरीमध्ये 5, अस्थिव्यंग 2 तर त्कचा किकार किभगात एकाला दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जे. जे. रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आले. यामध्ये घसरून पडल्याने एका 42 कर्षीय पुरुषाला तर 13 वर्षांच्या मुलाला अस्थिव्यंग किभगात दाखल करण्यात आले. 25 कर्षाच्या तरुणांच्या कानात रंग गेलय़ाने नाक-कान-घसा किभागात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे जी टी रुग्णालयात 12 जणांना दाखल करण्यात आल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

725 तळीरामांची धुंदी उतरवली

धुळवड खेळताना पेगवर पेग रिचवत तर्राट होऊन गाडय़ा चालविणाऱ्या 725 हून अधिक तळीरामांची आज पोलिसांनी धुंदी उतरवली. शिवाय ओव्हर स्पीडिंग, रॅश ड्रायव्हिंग आणि ट्रीपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांचादेखील पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केला.

धुळवड साजरी होत असताना काही अतिउत्साही तरुणांकडून नियम तोडण्याचे प्रकार घडणार याची खबरदारी घेऊन पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलिसांनीदेखील ठिकठिकाणी अतिउत्साही चालकांविरोधात फिल्डिंग लावली होती. त्यात तर्राट होऊन गाडय़ा चालविणारे-725 तर ओव्हर स्पीडिंग -430, रॅश ड्रायव्हिंग – 166, ट्रीपल सीट – 789, विदाऊट हेल्मेट – 4738 गाडय़ा चालविताना पोलिसांच्या जाळय़ात सापडले. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या 3827 चालकांवरदेखील दंडात्मक कारवाई केली.