गोदावरी दूध संघ : कालवडीला कालवड सॉर्टेड सिमेनचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

गोदावरी नामदेवराव परजणे दूध संघ व बायफ मित्र (बी.आय.एस.एल.डी) यांच्या संयुक्त सहकार्याने ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी सॉर्टेड सिमेन प्रकल्पांतर्गत एका कालवडीने जन्म दिलेल्या कालवडीला ही कालवड झाल्याने गोदावरी दुध संघ व बाहेरचा सोर्टेड सिमेंट चा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाल्याचे प्रतिपादन गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले आहे. उंदिरवाडी येथील गायीने जन्म दिलेल्या कालवडीवर नऊ महिन्यातच सॉर्टेड सिमेनचे रेतन करून त्या कालवडीनेही पुन्हा एका सुदृढ अशा कालवडीस जन्म दिला असल्याची घटना घडली आहे.

अमेरिका व युरोपिअन देशातील व्यावसायिक डेअरी फार्ममध्ये वापर होत असलेल्या आणि सुमारे 30 ते 32 लिटर दूध देणाऱ्या गायींची पैदास करणाऱ्या सुधारित वीर्याचे (सॉर्टेड सिमेनचे) वितरण गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघ आणि बायफ (बी.आय.एस.एल.डी) यांच्या सहकार्याने संघाच्या कार्यक्षेत्रात 20 जानेवारी 2016 पासून सुरू करण्यात आले. कार्यक्षेत्रातील येवला तालुक्यातील आडगांव चोथवा संकरीत गो – पैदास केंद्रामार्फत उंदिरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडील कृत्रिम रेतन केलेली गाय नऊ महिन्यातच व्याली. तिने जन्म दिलेल्या कालवडीस जून 2018 या महिन्यात इस्टर्न वळुच्या सॉर्टेड सिमेनचे रेतन करण्यात आले. त्यानंतर या कालवडीने 14 मार्च 2019 रोजी पुन्हा कालवडीस जन्म दिला. ही व्यालेली कालवड सद्या दररोज 20 लिटर दूध देत असून आईच्या तुलनेत ती चार लिटर दूध अधिक देत आहे.

सॉर्टेड सिमेनच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाने दूध क्षेत्रात एक नवी क्रांती निर्माण केली असून भविष्यात हा प्रकल्प दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच लाभदायक ठरणार आहे. अनेक शेतकरी या प्रकल्पाकडे वळत असल्याने दूध उत्पादन वाढीसाठी याचा चांगला लाभ होणार आहे. संघाच्या कार्यक्षेत्रात आजपर्यंत 403 कालवडी जन्मास आल्या असून 22 कालवडींना कृत्रिम रेतन करण्यात आलेले आहे. त्यापैकी 15 कालवडी गाभण आहेत अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर यांनी दिली. उंदिरवाडी येथे प्रथमच व्यालेल्या कालवडीची पाहणी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, बायफचे मुख्य कार्यक्रम समन्वयक व्ही. बी. दयासा, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, राष्ट्रीय डेअरी विकास बोडचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत धंदर, बायफचे अधिकारी डॉ. शब्बीर शेख, सुधाकर बाबर, भालचंद्र राऊत, योगेश खरे, महेश सोनवणे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.