
सामना प्रतिनिधी । कोपरगांव
तालुक्यातील खिर्डीगणेश ग्रामपंचायतीचे सरपंच सरला सोपान चांदर यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले म्हणून त्यांचे सरपंचपद नाशिक विभागीय अप्पर आयूक्त ज्योतिबा पाटील यांनी रद्द केले. या आदेशामुळे संपुर्ण कोपरगांव तालुक्यात खळबळ उडाली आहे. सरपंच सरला चांदर या अगोदरच त्यांचे पती सोपान चांदर यांच्या बेकायदेशीर कामामुळे अनेकवेळा अडचणींत सापडल्यामुळे त्या सतत वादग्रस्त ठरल्या आहेत.
खिर्डीगणेश येथील रहिवासी प्रदिप माधवराव नवले, निलेश दादा वराडे, जनार्दन निवृत्ती रोहोम, ज्ञानदेव देवराम रोहोम, संजय सखाराम लोखंडे, चंद्रकांत बाबूराव चांदर यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 16 अन्वये अप्पर आयूक्त नाशिक यांच्यासमोर अतिक्रमणांच्या मुददयाखाली सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरूध्द अपिल क्रमांक 3/2019 दाखल केले होते त्याचा निकाल अप्पर आयूक्त ज्योतिबा पाटील यांनी 15 मार्च रोजी दिला त्यामुळे खळबळ उडाली आहे., याच आशयाचे अपिल प्रदिप नवले व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे दाखल केले होते मात्र ते त्यांनी फेटाळले होते. अप्पर आयूक्त नाशिक यांच्यासमोर दाखल केलेल्या अपिलात सरपंच सौ सरला सोपान चांदर यांचे सासरे दगु वेडु चांदर यांनी वन खात्याच्या सर्व्हे नंबर 50 मध्ये ग्रामपंचायत मिळकत 306 केली त्याची अतिक्रमण नोंदवही 1 ई मध्ये प्रत सादर करण्यांत आले आहे, सरपंच सौ सरला चांदर व त्यांचे सासरे दगु वेडु चांगदर हे वनखात्याच्या शासकीय जमीन सर्व्हे नंबर 50 मध्ये एकत्र राहातात असे असतांनाही जिल्हाधिकारी नगर यांनी अपिल फेटाळले. या वादाबाबत अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद एैकुन घेतला. सरपंच सौ सरला सोपान चांदर यांनी सरपंचपदाची निवडणुक लढतांना निवडणुक नामनिर्देशन शपथपत्रात शौचालयाचा उल्लेखही याच वनविभागाच्या अतिक्रमीत जा्गेतच आहे. या संपुर्ण प्रकरणांत ग्रामसेवक सुमित गोसावी यांची संपुर्ण भूमिका संशयास्पद असल्याचे ताशेरे देखील या निकालपत्रात ओढण्यात आलेले आहे. सरपंच सरला चांदर व त्यांचे सासरे वेडु चांदर हे दोघेही एकत्र कुटूंबातच राहतात, या अतिक्रमीत जागेबाबत सरपंच सरला चांदर यांचा संबंध नसल्याचा कुठलाही ठोस पुरावा त्या सादर करू शकल्या नाहीत, त्यांनी दाखल केलेले इतर नावाचे सात-बारा उतारा, रहिवास पुरावा या प्रकरणांत ग्राह्य ठरत नाही त्यामुळे अप्पर आयूक्त ज्योतिबा पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडील न्यायनिवाडा सिव्हील अतिक्रमणाबाबत स्वयंस्पष्ट न्यायनिर्देश व त्या अनुषंगाने सरपंच सरला सोपान चांदर यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा निकाल दिल्यांने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामसेवक सुमित गोसावी यांनी खिर्डीगणेश गावातील अन्य प्रकरणांतही मोठ्या प्रमाणांत गैरव्यवहार करून सरपंच सरला चांदर यांच्या कामकाजास मुकसंमती दिल्यांने त्यांच्याविरोधात प्रदिप नवले व त्यांच्या सहकार्यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नगर यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाच्या कामकाजाचे एक-एक किस्से आता बाहेर पडत आहेत.




























































