पवारांनी शिंदेंना गटवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सोलापूर

राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघातून कोणाला उभे करायचे याचीच चिंता होती. कारण त्यांनी स्वतः ऐनवेळी माघार घेतली होती. शिवाय अकलूजचे मोहिते-पाटील यांनी मोबाईल फोन ‘स्विच ऑफ’ ठेवून भाजपात उडी घेतली होती. त्यामुळे उमेदवार कोण हा प्रश्न राष्ट्रवादीला भेडसावत होता. अखेर शुक्रवारी पवारांनी गळ टाकला आणि त्या गळाला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे लागले.

संजय शिंदे यांनी रीतसर राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पवारांनी त्याच कार्यक्रमात शिंदेंची माढातील उमेदवारीही जाहीर करून टाकली. शिंदे यांच्यासह उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. शिंदे हे शिवसेना-भाजपच्या टेकूवर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या खुर्चीत बसले आहेत.

शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँगेसचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. ते मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. जिल्हा परिषद निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले आणि अध्यक्ष झाले. रणजितसिंह मोहिते पाटील यांना विरोध म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. ते आता पुन्हा स्वगृही परतले आणि उमेदवारी पटकावली.