
>>देवेंद्र वालावलकर
“मला निवडणुकीचे तिकीट देताना माझे नेते, गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे असा उल्लेख केला होता. तो त्यांचा मोठेपणा झाला, पण पर्रीकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच मी आमदार बनलो. नंतर सभापती बनलो आणि आता मुख्यमंत्रीपदाची धुरा माझ्याकडे आली आहे. पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासाचा जो मार्ग आखून दिला आहे, त्यावर मी चालणार आहे. पर्रीकर यांनी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याबरोबरच तळागाळातील लोकांच्या विकासासाठी झटणार आहे.’’
डॉ. प्रमोद सावंत. गोव्याचे चोविसावे मुख्यमंत्री. डॉक्टर ते मुख्यमंत्री व्हाया सभापती हा प्रमोद सावंत यांचा जीवनप्रवास खरोखरच रोमहर्षक असा आहे. वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले सावंत हे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विश्वासू शिष्य म्हणून ओळखले जात होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते गोव्याचे सभापती होते. देशातील सर्वांत तरुण सभापती म्हणूनही त्यांची ओळख होती. डॉ. सावंत हे उत्तर गोव्यातील साखळी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून आले आहेत. सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973चा. गोव्यात शालेय शिक्षण झाल्यावर पुढे कोल्हापूर येथील गंगा शैक्षणिक संस्थेच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अर्थात समाजकार्याची लहानपणापासून असलेली आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे वैद्यकीय पदवी घेतल्यानंतरही त्यांनी ‘सोशल वर्क’ या विषयात ‘मास्टर्स’ केले. पुढे हीच समाजसेवेची आवड त्यांना राजकारणात घेऊन आली. मुळात वडील जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते असल्याने राजकीय आणि सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले.
कोल्हापूरात वैद्यकीय पदवी शिक्षण घेत असतानादेखील त्यांनी त्यांच्यातील राजकीय नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली होती. त्याठिकाणी महाविद्यालयीन निवडणुकांत ते नेहमी बाजी मारत. जनरल सेक्रेटरीपदीदेखील ते निवडून आले होते. त्यांच्या आयुष्यातील तशा अर्थाची ती पहिली निवडणूक होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा तो एकप्रकारे श्रीगणेशाच म्हणता येईल. पुढे ते भारतीय जनता युवा मोर्चाचे काम पाहू लागले. भाजयुमोचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. 1997 मध्ये त्यांनी बीएएमएस ही पदवी घेतली. पुढे ते गोव्यात परतले. आधी भाजयुमो आणि नंतर भाजपच्या माध्यमातून त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य सुरूच होते. याच काळात सावंत हे मनोहर पर्रीकर यांचे विश्वासू अनुयायी बनले. पर्रीकर यांनी गोव्यात भाजपची जी राजकीय मशागत केली त्याचे फळ त्यांना 2012च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले. या संपूर्ण काळात पर्रीकर यांच्यासोबत भाजपची जी निष्ठावान मंडळी कार्यरत होती त्यात डॉ. प्रमोद सावंत हेदेखील होते.
त्यातूनच त्यांना 2012 मध्ये पक्षाने पहिल्यांदा साखळी विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले. ते निवडूनही आले. नंतर दुसऱया निवडणुकीतही ते जिंकले. त्यांची विधानसभा सभापती म्हणून निवड करण्यात आली. देशातील तरुण सभापती अशी त्यांच्या नावाने नोंद झाली. आता पर्रीकर यांच्या निधनानंतर ते वयाच्या अवघ्या पंचेचाळिशीत त्यांचे वारसदार म्हणून मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी असली तरी पर्रीकर आज हयात नाहीत याचे दुःख आणि उणीव त्यांना भासते. अर्थात त्यांच्यासमोर आव्हानही मोठेच आहे. गोव्यातील भाजप सरकारचे जहाज अत्यंत अस्थिर आहे. त्याचे सुकाणू त्यांना सांभाळायचे आहे. घटक पक्षांची रस्सीखेच आणि इतर राजकीय आव्हाने यांना यशस्वी तोंड द्यायचे आहे. मंत्रीपदाचा अनुभव नसतानाही ते थेट मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे गोव्यातले अस्थिर जहाज ते कसे सांभाळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अर्थात डॉ. प्रमोद सावंत हे पर्रीकरांच्या तालमीत तयार झाले आहेत. पर्रीकरांच्या आजारपणाच्या काळात सरकारचे प्रतिनिधित्व करताना शासकीय कार्यक्रमांमध्ये पर्रीकर यांची त्यांनी अजिबात उणीव भासू दिली नव्हती. ही त्यांची जमेची बाजू म्हणता येईल. पुढील महिन्यातील लोकसभा निवडणूक आणि नंतर विधानसभेच्या चार मतदार संघातील पोटनिवडणुका पक्षाला जिंकून देणे ही डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी खरी ‘लिटमस टेस्ट’ असेल.
सावंत यांचे कुटुंब मूळचे कोल्हापूरचे असून सध्या ते गोव्यात कोठंबी पाळी येथील गावात राहतात. पद्मिनी आणि पांडुरंग सावंत हे त्यांचे आई वडील. वडिलांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम केलेले आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा या डिचोली तालुक्यातील शांतादुर्गा शाळेत शिक्षिका असून भाजप महिला प्रदेशच्या त्या अध्यक्ष आहेत.


























































