
सामना प्रतिनिधी, मुंबई
राजकीय धुळवड सुरू झाली असून आता वेगवेगळे रंग उधळले जातील. मात्र आपला भगवा रंग विसरू नका. भगव्या रंगाने महाराष्ट्रच काय, देश व्यापून टाका. शिवरायांचा हा भगवा दिल्लीच्या तख्तावर फडकवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना केले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उद्धव ठाकरे यांनी शिवरायांना अभिवादन केले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, यंदाची शिवजयंती अनोखी आहे. उद्या कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आजच प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. सच्च्या शिवभक्तांना निवडणुकीत काय करायचं ते सांगावं लागत नाही. तेव्हा शिवसैनिक निष्ठेने कामाला लागतील आणि शिवरायांचा भगवा महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावर फडकवतील.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर व उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनीही शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मुंबई म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, सचिव संजय कदम, डॉ. दीपक सावंत, सुभाष कांता सावंत यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
किल्ल्याचा देखावा कायमस्वरूपी उभा राहणार
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामागे उभारण्यात आलेला किल्ला तसेच मुंबादेवीची भव्य मूर्ती असलेल्या प्रतिकृतीची पाहणी करून उद्धव ठाकरे यांनी देखावा साकारणारे कलादिग्दर्शक अमन विधाते यांचा सत्कार केला. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवजयंतीला दरवर्षी शिवसेनेकडून विमानतळाजवळील शिवरायांच्या पुतळ्यामागे किल्ल्याचा देखावा उभारला जातो. शिवजयंतीनंतर हा देखावा काढला जातो. मात्र आता हा देखावा दिखाव्यापुरता नाही, तर कायमस्वरूपी साकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना सर्वात आधी मुंबादेवीचं दर्शन घडेल अशी कलाकृतीही इथे उभारली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती चेंबूरच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, खासदार राहुल शेवाळे, शिकसेना सचिक सूरज चव्हाण, शिक्षण समिती अध्यक्ष विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, विभाग संघटक रीता वाघ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार तुकाराम काते व उपनेते सुबोध आचार्य यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ निनादणारा जयघोष…शिवरायांना वंदन करण्यासाठी भगवे झेंडे, भगवी उपरणी, भगवी वस्त्रs परिधान करून जमलेला जनसागर…ढोल-ताशांचा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईसह राज्यभरात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यभरात ठिकठिकाणी शिवजयंतीचा जल्लोष होता. शिवजयंती उत्सव साजरा करतानाच अनेक ठिकाणी लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले.
शिवराज्याभिषेकाची भव्य रांगोळी
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच शिवराज्याभिषेकाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. टर्मिनलमध्ये प्रवेश करणारे देश-विदेशातील पर्यटक ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. विमानतळाच्या आवारात पहिल्यांदाच अशा प्रकारची रांगोळी साकारण्यात आली असल्याचे भारतीय कामगार सेनेचे संजय कदम यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवरायांचा पुतळा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लोकार्पण केलेला शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाताना आयटीसी हॉटेलजवळ दिसतो. हा पुतळा तेथून आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात हलवला जाणार असल्याची माहिती विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांनी दिली.



























































