
सामना ऑनलाईन। मुंबई
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण आणि हार्बर रेल्वेच्या कुर्ला-वाशी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द करण्यात आल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ठाणे-कल्याण आणि कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेतर्फे ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान कल्याण स्थानकातील कसारा दिशेला असलेला जुना पादचारी पूल तोडण्यात येणार असल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 4 या वेळेत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळातील डाऊन धीम्या मार्गावरील फेऱ्या मुलुंड आणि कल्याणदरम्यान जलद डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे, दिवा आणि डोंबिवली या मार्गावर लोकल थांबणार आहे. ब्लॉक काळात अप मार्गावरील लोकल सुमारे 10 ते 15 मिनिटे आणि डाऊन मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशीराने धावणार आहेत. 1974 साली उभारण्यात आलेला कल्याण स्थानकातील कसारा दिशेकडील पूल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पूलाचे काम रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 5 या काळात करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 या वेळेत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
























































