तोकडे कपडे घालण्याच्या फर्मानाविरोधात जे.जे.तील भावी डॉक्टरांची निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जे. जे. ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनींनी कार्यक्रमांदरम्यान तोकडे कपडे घालू नयेत या रुग्णालय प्रशासनाच्या निर्देशांविरोधात एमएमबीएसच्या विद्यार्थिनींनी आज निदर्शने केली. होळीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कपडे फाडाफाडीच्या घटनेनंतर भावी डॉक्टरांना शिस्त लावण्याबाबत जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता ठाम असताना विद्यार्थ्यांकडून मात्र या निर्देशांचा निषेध केला जात आहे.

जे. जे. ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून कपडे फाडाफाडी तसेच काही विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याचे समजते. यामुळे संतप्त झालेल्या अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी तत्काळ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कसे वागावे याबाबत कडक नियमावलीच तयार केली. याविरोधात आजही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. विद्यार्थिनींनी स्कर्ट टॉप घालून आणि चेहरा स्कार्फने झाकून अधिष्ठात्यांच्या फर्मानाचा निषेध नोंदवला, मात्र यानंतरही प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असून विद्यार्थी हे भावी डॉक्टर आहेत. हे विद्यार्थी इथे शिक्षणासाठी आले आहेत. त्यामुळे त्यांनी नियम पाळायलाच हवेत असे मत व्यक्त करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून मात्र यावर काहीही बोलण्यास नकार देण्यात आला.

विद्यार्थ्यांना घालून दिलेली नियमावली

विद्यार्थ्यांनी यापुढे कोणताही कार्यक्रम अधिष्ठातांच्या परवानगीशिवाय करू नये. कोणताही कार्यक्रम 9.30च्या आतच संपायला हवा. विद्यार्थ्यांनी योग्य पोषाखातच कार्यक्रमात उपस्थित राहावे. विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारचे तोकडे कपडे घालू नयेत, अशा सूचना अधिष्ठातांकडून करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी होळीच्या कार्यक्रमात जे वर्तन केले आहे त्याची चौकशी होणारच आहे. शिवाय त्यांना घालून देण्यात आलेल्या निर्बंधात कोणतीही सूट दिली जाणार नाही. यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन नाही, पण भावी डॉक्टर होणार असलेल्या विद्यार्थ्यांचा पोषाख तसेच वर्तनात सभ्यता असावी हाच हेतू आहे.

डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता