हिंगोलीत आठ उमेदवारांचे अर्ज बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 42 पैकी 34 उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये वैध ठरले आहेत तर 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. पात्र उमेदवारांमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, अपक्ष शिवाजी जाधव, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभेच्या निवडणूक रिंगणात 42 उमेदवारांनी 73 अर्ज 19 ते 26 मार्च च्या दरम्यान दाखल केले होते. आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये 73 पैकी सोळा अर्ज अवैध ठरल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान 42 पैकी 8 उमेदवारांच्या कागदपत्रात त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर 34 उमेदवार पात्र झाले आहेत. या पात्र उमेदवारांपैकी दोन दिवसात किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात हे 29 मार्च रोजी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या डॉ. बी.डी. चव्हाण यांच्या अर्जावरून काही काळ गोंधळ उडाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बी. डी. चव्हाण यांचा अर्ज बाद केल्यावर त्यांनी यावर आक्षेप नोंदवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याचे सूत्रांकडून समजले. तसेच अर्ज बाद करण्यासंबंधी झालेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेणारा अर्ज देखील त्यांनी दाखल केला. छाननीची प्रक्रिया संपून पाच तास उलटून गेल्यावर पात्र व अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. चाऊस शेख जाकेर शेख महुमद, नारायण रामा पाटील, मस्के कोंडीबा गौनाजी, गंगाधर दादाजी बलकी, आबासाहेब विठ्ठल कल्याणकर, चव्हाण बाबु धनू , नारायण तुकाराम इरबतनवाड यांचे अर्ज बाद झाले आहेत.