यंदाच्या निवडणुकीत ‘सखी मतदान केंद्र’; अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत महिलाच पाहणार कामकाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मतदान केंद्रात तैनात पोलिसांपासून ते निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱयांपर्यंत सर्व महिलाच कामकाज पाहणार आहेत. ही केंद्रे महिला व्यवस्थापित असणार आहेत. त्यामुळे त्यांना ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे.

या मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. केंद्रातील कुठल्याही राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या ‘सखी मतदान केंद्रा’त महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोषाख परिधान करू शकतात. हे मतदान केंद्र अधिकाअधिक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफ सफाईवर भर देण्यात येणार आहे.

महिला मतदारांचा टक्का वाढला
यंदाच्या निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. 2014 च्या तुलनेत महिला मतदारसंघाचा टक्का 889 वरून 911 इतका वाढला आहे. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिलांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.

महिला मतदार केंद्रापर्यंत येणार
‘सखी मतदार केंद्र’ उभारल्यामुळे महिलांचा मतदानाची सहभाग वाढणार आहे. ‘सखी मतदार केंद्रा’वर अधिकारी, कर्मचारी महिलाच असतील. प्रत्येक मतदारसंघातून एकाच मतदान केंद्राची निवड करण्यात येणार आहे. तसेच महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याजवळच्या केंद्राची तसेच ज्या मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱयांचा संपर्प कायम राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगासाठी निवड करण्यात येणार आहे.