Lok Sabha 2019 बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने भरला उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

लग्नाला काही घटका उरलेल्या असताना जालना मतदारसंघातील एका नवरदेवाने वऱ्हाड्यांसोबत येऊन आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुदाम इंगोले असे त्या नवरदेवाचे नाव असून तो प्रहार संघटनेचा कार्यकर्ता आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुदाम त्याच्या वऱ्हाड्यांसोबत बदनापूर तालुक्यातील उजैनपुरीकडे रवाना झाला.

आज जालना मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस होता. सुदाम इंगोले हा जालना तालुक्यातील धारकल्याण गावचा राहणारा आहे. आज 28 मार्च रोजी सुदामचा विवाह बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील शीतल काळे हिच्याशी पार पडला. मात्र लग्नबंधनात अडकण्याआधी सुदामने त्याची सामाजिक जबाबदारी समजून लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरला. यावेळी त्याने आपल्यासमोर तगडे उमेदवार असले तरी या निवडणुकीत लाखभर मतांनी निवडून येऊ असा विश्वास सुदामने व्यक्त केला आहे.

सुदाम हा प्रहार संघटनेचा कार्यकर्ता आहे. या संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी देखील जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.