मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी हेमंत पाटील यांना भक्कम साथ द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शिवसेना हा दिलेल्या शब्दाला जागणारा पक्ष असून शिवसेना-भाजपा युतीच्या शासनाने मागिल ५ वर्षात समाजातील सर्व घटकांसाठी विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांना भक्कम साथ देऊन प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर व राजश्री हेमंत पाटील यांनी केले.

हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी प्रसिध्द वक्त्या व गोदावरी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, आखाडा बाळापूर, वारंगासह विविध गावात भेटी देऊन महिला व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शिवसैनिक आर.आर. पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हेमंत पाटील हे हिंगोली जिल्ह्याचे भुमिपुत्र असून त्यांचा आजवरचा प्रवास येहळेगावच्या तुकामाईच्या आशीर्वादाने झाला आहे. यासाठी या जिल्ह्यासोबत भावनिक नाते असून सर्वांगीण विकासाकरिता त्यांना विजयी करा, असे आवाहन राजश्री पाटील यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह राम कदम व अन्य पदाधिकाऱ्यांनी हिंगोली शहर व विविध गावात भेटी दिल्या. शिवसेना प्रत्येकाच्या अडी-अडचणीला धावून येते. यासाठी शिवसेनेचे प्रत्येकासोबत आपुलकीचे नाते असून पाच वर्षासाठी कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून हेमंत पाटील हे निश्चितच छाप पाडतील. जिल्ह्याच्या विकासाकरिता त्यांना निवडुन द्या, असे आवाहन जिल्हाप्रमुख बांगर यांनी केले. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांनी देखील विविध भागात जाऊन प्रचार केला.