
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याचा आज (2 एप्रिल) पन्नासावा वाढदिवस आहे. वाढदिवशी अजयने चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. अजय देवगन, रकूल प्रीत सिंह आणि तब्बू यांच्या प्रमूख भूमिका असणारा ‘दे दे प्यार दे’ (De De Pyaar De) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘दे दे प्यार दे’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अजय देवगन पुन्हा एकदा अॅक्शन चित्रपटाकडून कॉमेडी ड्रामाकडे वळल्याचे दिसत आहे. या चित्रपटामध्ये वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलेला ‘वयस्कर’ अजय देवगन दाखवला आहे. अजय देवगन चित्रपटामध्ये त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्ष लहान असणाऱ्या मुलीच्या प्रेमामध्ये पडतो. यावेळी त्याला चित्रपटातील साईड अभिनेत्री विचारते तेव्हा तो सैफ अली खान आणि करिना कपूरचे उदाहरण देतो.
अजय देवगन आणि अभिनेत्री रकूल प्रीत सिंह यांचे प्रेमप्रकरण व या प्रेमप्रकरणाचा पचका करण्यासाठी आलेली अजयची पूर्वाश्रमीची पत्नी तब्बू यांचा हा कॉमेडी ड्रामा पाहण्यास नक्कीच मजा येईल असे ट्रेलरवरून वाटत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नेटिझन्सनी डोक्यावर घेतले आहे. अवघ्या काही तासांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. 3 मिनिट 17 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये कॉमेडीचा तडका चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट 17 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा लव रंजन याने लिहिली आहे. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाची पटकथाही लव रंजन याने लिहिली होती. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची कथाही तगडी आहे असे दिसत आहे.




























































