उष्णतेच्या लाटांचा वेग वाढणार; उष्माघाताचे दोन बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वैशाख वणव्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उष्माघाताने नागपूरमध्ये दोन बळी घेतल्याची घटना आज घडली. विविध ठिकाणी रस्त्यावर दोन वृद्धांचे मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. राज्याच्या अनेक भागांत 42 ते 43 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, बीड, जळगाव, मालेगाव या शहरात उन्हाचे सर्वाधिक चटके जाणवले. दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा वेग आणखी वाढणार असून उन्हाळ्याची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत आज मंगळवारी 32 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली तरीही उकाडा कायम होता. अरबी समुद्रातून ऍन्टीसायक्लॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वारे मुंबईच्या दिशेने वाहत आहेत. हे वारे आर्द्रतायुक्त असल्यामुळे मुंबईतही प्रचंड उकाडा आणि उन्हाचे चटके बसत आहेत. पुढच्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. पुढचे तीन महिने मुंबईसह महाराष्ट्राची अक्षरशः भट्टी होणार आहे. विदर्भ, मराठवाडय़ात कडक उन्हामुळे डांबरही वितळत असल्याचे चित्र आहे. नद्या, विहिरी कोरडय़ाठाक पडल्या असून दुष्काळाच्या झळा आणखी वाढणार आहेत. दरम्यान, नागपुरात आढळलेल्या दोन मृतदेहांपैकी एक व्यक्ती 60 वर्षांची तर दुसरी व्यक्ती 50 वर्षे वयाची आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या आठवडय़ापासून विदर्भातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मार्च महिन्यात तिसऱ्या आठवडय़ापर्यंत विदर्भ आणि मराठवाडय़ात अनेक भागांत अवकाळी पाऊस पडला.

अनेक भागांत अजूनही चाळिशीपार

राज्याच्या अनेक भागांत अजूनही 40 ते 42 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद होत आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 या दरम्यान, घराबाहेर पडू नका. पडल्यास महिलांनी चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळावा तर पुरुषांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए.के. श्रीवास्तव यांनी केले आहे.

शहर तापमान

  • चंद्रपूर 43
  • बीड .. 42
  • जळगाव 42
  • मालेगाव 42
  • गोंदीया 41
  • धाराशीव … 41
  • नागपूर 41
  • पुणे … 40
  • सातारा 40
  • सांगली 40

  • राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 43 डीग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.
  • गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार.
  • मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
  • मुंबईत आकाश निरभ्र राहाणार