
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहरातील सुभाष चौकात ज्युस पिण्यासाठी थांबल्यानंतर मोटार सायकलच्या डिक्कीमधून १ लाख ५५ हजार रुपये पळवण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहू रामराव गाडे रा. मोहगाव ता. रेणापूर यांनी या प्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला. २ एप्रील रोजी फिर्यादी व त्यांच्या सोबत मेव्हणे विठ्ठल वसंत कदम रा.मोघा यांनी एचडीएफसी बँकेतून काम करून सुभाष चौकात आले. फिर्यादीचे मोठे भाऊ हे गोविंद गुट्टे यांच्या मोटारसायकलवर तिथे आले. मोटार सायकलच्या डिक्कीमध्ये १ लाख ५५ हजार रुपये होते. सुभाष चौकात ज्युस पिण्यासाठी सर्वजण गेले. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने १ लाख ५५ हजार रुपयांची पिशवी पळवली. गांधी चौक पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी २ तारखेस सायंकाळी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































