प्रेमाचे प्रतीक क्रौंच पक्षी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारस क्रौंच पक्षी. रामायणापासून प्रेमाचे, एकनिष्ठतेचे प्रतिक. आपल्या जोडीदारावर याचे नितांत प्रेम. क्रौंच पक्ष्याबद्दल लेख लिहिताना मी खूप भारावून गेले आहे. जगामध्ये इतक्या उत्कट प्रेमाचे दुसरे उदाहरण नाही!

क्रौंच पक्षी पाणथळी पक्ष्यांमध्ये सर्वात रुबाबदार व अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये क्रौंच पक्षी प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यांची प्रणयक्रीडा व नृत्य पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या प्रेमाची प्रचीती येते. या पक्ष्यांमध्ये नर-मादी जोडी आयुष्यभर एकत्र बरोबर राहते. क्रौंच पक्ष्यांवर महर्षी वाल्मीकींचे अनुरूप असे काव्य आहे.
‘मा निषाद सुखं तव आप्ससि, हत्वा मिथुनादेकं क्रौंच युगलं।

अरे व्याधा! प्रणयी क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यांपैकी एकाची हत्या करून तुला कदापि सुख मिळणार नाही!! या पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत. हिंदुस्थानात सारस क्रौंच, सायबेरियन क्रौंच, कांडय़ा करकोचा (क्रौंच) व सामान्य क्रौंच हे मुख्यत्वे आढळून येतात. सायबेरियन क्रौंच हा हिवाळय़ात सायबेरिया येथून राजस्थानमधील भरतपूर येथे स्थलांतर करतो. हा पक्षी आता अत्यंत दुर्मिळ झाला असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या लेखात आपण सारस क्रौंच पक्ष्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

सारस क्रौंच Sarus Crane
सारस पक्षी नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर एकच जोडीदार पसंत करतो. अगदी पुराणातसुद्धा या पक्ष्याचा उल्लेख असा आढळतो की, तो आपल्या जोडीदाराला मरेपर्यंत सोडत नाही व दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा अन्न, पाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो. असे म्हणतात की, एकमेकांशी न पटणाऱया, भांडणाऱया पती-पत्नीला या सारस पक्ष्यांच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा एकेकाळी हिंदुस्थानात होती. या पक्ष्याला पाहून वाल्मीकी ऋषींना ‘रामायण’ हे महाकाव्य सुचले, अशी वदंता आहे. एकमेकांसाठी जीवनभर जगणाऱया सारस पक्ष्याच्या जोडीला पाहून त्यांना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या एकनिष्ठ प्रेमाची कथा लोकांना सांगावीशी वाटली.

सारस क्रौंच अथवा नुसतेच सारस या पक्ष्यांची हिंदुस्थानातील एकूण संख्या सुमारे आठ हजार ते दहा हजार आहे. जगामधील त्यांची संख्या 35 हजारांवर आहे. दक्षिण हिंदुस्थानाच्या तुलनेत उत्तर हिंदुस्थानात हा जास्त प्रमाणात आढळून येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोऱयात आहे. सारस पक्षी उत्तर प्रदेशाचा राज्य पक्षी आहे. भरतपूर व जवा डॅम (राजस्थान), सुलतानपूर (हरियाणा), थोल (गुजरात), पोंग डॅम (हिमाचल प्रदेश) येथेही मोठय़ा प्रमाणात या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहेत. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात फारच कमी, पण थोडय़ाफार प्रमाणात व विदर्भात तसा बऱयापैकी दिसतो. भंडारा जिह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान तसेच नागझिरा, अभयारण्यात, मेळघाटमधील जंगलांच्या पाणथळी जागांमध्ये/भातशेतीमध्ये दिसण्याची शक्यता असते.हे पक्षी स्थानिक असून ‘पृथ्वीवरील सर्वात मोठे उडणारे उंच पक्षी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. याची मुख्य खूण म्हणजे उंच मान आणि पाय. चेहरा आणि डोके लाल असून त्यावर पांढरा पट्टा व ठिपका असतो. बाकी शरीर हलक्या करडय़ा रंगाचे असते. लांबी साधारणपणे 176 से.मी. (5 फुटाच्या) आसपास असते तर पंखांचा पिसारा 250 से.मी. (8.5 फूट ) असतो. नर व मादी सारखेच दिसतात. फक्त मादी नराच्या तुलनेत थोडी लहान असते. इतर क्रौंच पक्ष्यांप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे. तसेच भातशेतीचे प्रदेश यांचे आवडते स्थान आहे.

मुख्यतः पावसाळी हंगाम सारस पक्ष्यांचा पुनरुत्पादन कालावधी आहे. त्यांचे प्रेम नृत्य सुरू होते. नृत्य सुरू होण्याआधी हे पक्षी आकाशाच्या दिशेने चोच करून तीव्र आवाज देतात. मादी एका वेळी दोन ते तीन अंडी देते. नर व मादी दोघे मिळून पाळीपाळीने अंडी उबवण्याचे काम करतात. सुमारे एक महिन्यानंतर पिले अंडय़ातून बाहेर येतात. पिल्लांचे 4-5 आठवडय़ांपर्यंत मऊ मुळे, कीटक, शेण आणि धान्य असे खाद्य देऊन पालन करतात. त्यानंतर मात्र पिले आपापले खाद्य शोधतात. दोन महिन्यांत पिले उडायला शिकतात. पिल्लांचे शरीर फिकट लाल तपकिरी रंगाचे असते, जे सुमारे एक वर्षात पांढरे होते. या पक्ष्यांचे आयुष्य 18 वर्षांपर्यंत असू शकते. मला या पक्ष्यांचे फोटो केवलदेव-भरतपूर येथे काढण्याची संधी मिळाली. त्यांचे नृत्य करताना काढलेले फोटोही त्यांच्या प्रेमाची परिभाषाच आहे असे आवर्जून वाटले.