
सामना प्रतिनिधी, उटी बुद्रुक
औसा व लातूर तालूक्याच्या सीमेवर असलेला उटी बुद्रुक येथील तावरजा मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहे. या प्रकल्पामधुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने हा प्रकल्प कोरडा पडला आहे.
या प्रकल्पाची क्षमता 27.720 दलघमी असून या मध्यम प्रकल्पाची निर्मिती ती 1982 ला झाली. हा मध्यम प्रकल्प 36 वर्षात 16 वेळेस पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पातून औसा पाणी पुरवठा योजना आलमला पाणी पुरवठा 20 खेडी, 5 खेडी, गंगापूर, पेठ, खंडापूर, मांजरा कारखाना इत्यादी ठिकाणी होतो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने हा प्रकल्प कोरडा पडलेला दिसून येत आहे. तावरजा मध्यम प्रकल्प कोरडा पडल्याने उटी, लखनगाव, भादा, बोरगाव, बऱ्हाणपूर इत्यादी गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा होता. मात्र यावर्षी या परिसरावर निसर्गाने पाठ फिरवल्याने मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडा पडला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना बागायतदारांना उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोडावे लागत आहे. त्यामुळे या परिसरावर दुष्काळाची गडद सावली पडलेली दिसते.
या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा होत असून अनेक माळरान सुपीक बनत आहेत. त्यामुळे प्रकल्पात पाणी साठा वाढण्यास मदत होईल त्यामुळे भविष्यात एकदा प्रकल्प भरला की 2 वर्षे पाणी पुरेल. मात्र हा प्रकल्प कोरडा पडल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले दिसत आहेत.




























































