मालवणातील मासेमारी बोट वेंगुर्ले समुद्रात बुडाली, दगडावर आपटल्याने अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

समुद्रात खडकावर आपटून बोट बुडल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वेंगुर्ले समुद्रातील निवती रॉक परिसरात घडला. दरम्यान सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने बोटीतील पाचही खलाशांना वाचण्यात यश आले. मात्र बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत अपघातग्रस्त बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते.  मालवण येथील तपस्वी मयेकर यांच्या मालकीची दर्यासागर ही मच्छिमारी नौका घेऊन तांडेल दिलीप, गणपत वडवकर आणि खलाशी दत्ताराम तारकर, विलास मांडवकर, प्रदिप जाधव (चौघे रत्नागिरी), मोरेश्वर दगडू बारजे (लांजा) हे मासेमारीसाठी ६ ते ७ वाव खोल समुद्रात गेले होते. निवती रॉक नजिकच्या परिसरात मासेमारी करताना तांडेल यांना खडकाळ भागाचा अंदाज न आल्याने बोट खडकावर आपटली.

बोट दगडावर आपटल्याने पडलेल्या भगदाडातुन बोटीत वेगाने पाणी शिरत होते. पाणी उपसा करणारा बोटीतील पंपही बंद पडला. जीव वाचवण्यासाठी हातानेच बोटीतील पाणी उपसा करण्याचे काम खलाशी करत होते. मात्र बोट भरकटत चालली होती.

अपघाताची माहिती खलाशांनी मालक व अन्य मच्छिमारांना दिली. निवती रॉकवर असणार्‍या कर्मचार्‍यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ याची माहिती वेंगुर्ले पोलिस स्थानकात दिली. वेंगुर्ले पोलिसांनी  यांची माहिती निवती पोलिसांना दिली.

…..अन सुरक्षा यंत्रणांनी खलाशांना वाचवले 

सागरी पोलिसांनी माहिती मिळताच वेंगुर्ले येथील पंचगंगा व मालवण येथून सागरकन्या या हायस्पीड नौकांसह पीएसआय गणेश तेली व पीएसआय एसपी खंदारे व ताम्हणकर, धुरी, गिरकर, कदम, ढोलये, चंदनशिवें, पावसकर व शेलटकर आदी कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. तर संजीवनी ही गस्ती नौका तसेच तपस्वी मयेकर व  अन्य मच्छिमार बांधवही पोहचले. बुडणाऱ्या बोटीतील पाचही खलाशांना वाचवण्यात यश आले.