
>>दिलीप जोशी<<
आठवडाभरापूर्वीची गोष्ट. छान गप्पा रंगल्या होत्या. एवढय़ात एकाचा फोन किणकिणला. त्याचं बोलणं झाल्यावर त्याने बऱ्याच दिवसांनी भेटलेल्याला विचारलं, ‘‘माझा हा नंबर आहे ना तुझ्याकडे?’’ तो म्हणाला, ‘‘नाही. तू मिसकॉल दे.’ त्याने दिला, पण त्याचा फोन वाजलाच नाही. ‘‘अरे बापरे! फोन कुठे गेला. घरून निघताना तर घेतल्याचं आठवतंय. कुठे गहाळ झाला की काय?’’ ‘‘मधे कुठे गेला होतास का?’’ ‘‘हो, त्या अमक्यातमक्याला भेटायला गेलो होतो.’’ ‘‘मग त्यांना फोन कर.’’ ‘‘अरे, पण त्याचा नंबर कुठे मला पाठ असणार? आपला स्वतःचाच नंबर लक्षात राहण्याची मारामार.’’ गप्पांमधील गंमत संपली. सगळं वातावरण गंभीर झालं. मग मित्राने त्याच्याच फोनवर फोन केला. तो त्याच्या बायकोने घेतला. ‘‘हे फोन घरी विसरलेत. नेहमीचाच वेंधळेपणा आहे, दुसरं काय!’’
फोन सुरक्षित असल्यामुळे निःश्वास टाकला तरी आता त्याचं मन गप्पात रमेना. कधी एकदा घरी जाऊन फोन हस्तगत करतोय असं त्याला झालं होतं. इतकी ही गॅजेट्स आता अंगवळणी पडलीयत. ही तर तशी पन्नाशीपुढच्यांची गोष्ट. मग तरुणाईचं काय होत असेल! एक तरुण विद्यार्थी चिरंजीव तर फोन घरी राहिला म्हणून पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून घरी जाऊन परत आले! ‘‘काही महत्त्वाचा मेसेज, डेटा किंवा कामाची काही डॉक्युमेंट्स बघणं अनिवार्य होतं का?’’ या प्रश्नावर ‘‘छे! छे! पण रेस्टलेस झालो होतो ना!’’ हे उत्तर ग्रेट! एकविसाव्या शतकाची चाहूल लागली तेव्हा परदेशात रुळलेले ‘पेजर’ आणि त्यापाठोपाठ सेलफोन आपल्याकडे अवतरले. ‘इनकमिंग कॉल’लासुद्धा भरपूर पैसे मोजावे लागणाऱ्या त्या काळात मोठय़ा आकाराचा ‘मोबाईल’ ही प्रतिष्ठsची गोष्ट होती. अनेकांना जे सहन उपलब्ध नसतं ते मिरवण्यात ‘प्रतिष्ठा’ मानली जाते. त्यातलाच हा प्रकार. ट्रेन, बसमध्ये कुणाचा मोबाईल किणकिणला तर सगळे माना वळवून बघायचे. आता कोणी मोठय़ा आवाजात त्यावर बोललं तरी तिरस्काराच्या नजरा रोखल्या जातात.
कोणतंही तंत्रज्ञान नवं आणि सहजसुलभ असेल तर ते हवंहवंसं वाटतंच. त्यातच मोबाईलसारखी वस्तू म्हणजे कमालीची सोयिस्कर. या खिशात मावणाऱ्या फोनने केव्हाही, कुठेही संपर्क साधता येणं ही मोठीच क्रांती होती. सुरुवातीला नुसत्या बोलण्या-ऐकण्याची सेवा असलेली ही गॅजेट्स ‘नेट’मुळे सर्वव्यापी झाली. अगदी लॅपटॉप, टॅबचंही काम छोटे, हलक्या वजनाचे सेलफोन करू लागले. त्यावर आवश्यक संदेश मिळण्यापासून ते बातम्या आणि चित्रपटांपर्यंत सर्वकाही तळव्यावर आलं. त्याच स्क्रीनच्या कोपऱ्यातून पलीकडून परदेशातल्या मुलांच्या घरसंसाराचं दर्शन देऊ लागले. दूरस्थ मंडळी कोणत्याही क्षणी परस्परांना पाहू लागली, बोलू लागली. जयवंत दळवींच्या ‘संध्याछाया’ नाटकात नुसताच फोन होता. परदेशातून केव्हातरी येणारा, तिथे स्थायिक झालेल्या मुलांचा. आता तो दुरावा उरला नाही. माणसं म्हटलं तर खूप सहजतेने संपर्कात येऊ लागली, पण त्यामुळे ‘जवळ’ आली का? हा वेगळा, चर्चा करता येईल असा प्रश्न उरलाच.
दुसरी गोष्ट म्हणजे या गॅजेट्सच्या विस्मयकारी विलोभनीय रूपाच्या प्रेमात लहानथोर सारेच पडले. स्मार्टफोन खिशात नसणं हा बावळटपणा ठरू लागला. आपण फोनविनाही ‘स्मार्ट’असून शकतो याचा जणू विसरच पडला. प्रत्येक क्षणाला ‘शेअर’ करण्यासारखं खरंच काय असतं किंवा काहीतरी फॉरवर्ड करताना आपण विचार करतोय का याचाच विचार खुंटला आणि डोळ्याची पापणी लवावी इतक्या ‘प्रतिक्षिप्त’ क्रियेने संदेशांचं आदान-प्रदान सुरू झालं. त्याविषयी कोणी काही सांगितलं तर ऐकू येणं कठीण. कारण कानात इअरफोनची कवचकुंडलं.
मग घरातल्या या खोलीतून त्या खोलीतल्याला ‘मेसेज’ करण्यापर्यंत ‘प्रगती’ झाली. आपण आहोत त्या ठिकाणी ‘नाही’ असं बिनदिक्कत सांगता येऊ लागलं. आपल्याच विश्वात जो तो रमला. कुणी म्हणेल मग बिघडलं कुठं? नव्या युगाची हीच रीत आहे. तो विपरीत आहे असं मुळीच नाही. पण हे सगळं जरा ‘अति’ होतंय असं वाटणारे सुज्ञ ‘प्रगत’ म्हणवणाऱ्या देशातही त्याबद्दल लिहू बोलू लागले. पॅटन ओस्वाल्ट नावाच्या अमेरिकन विनोदकाराने एका प्रसिद्ध साप्ताहिकात आपल्या ‘कॉलम’मध्ये चार वर्षांपूर्वी लिहिलं, ‘‘मी या ट्विटर वगैरे गोष्टींपासून स्वतःला काही काळ दूर ठेवलं आणि काही जुने चित्रपट पुन्हा बघितले. बॅकयार्डमध्ये बागकाम करण्याचा आनंद अनुभवला. आसपासच्या पर्वतराजीत भटकून आलो. चांगला व्यायाम घडला, उत्साह वाढला, वजन घटलं, एवढंच नव्हे किराणा माल आणायला जाताना फोन घरी ठेवल्याने जगाकडे ‘नव्याने’ बघता आलं. तिथे प्रत्येक जण फोनला नजर खिळलेला बघून गंमत वाटली आणि लक्षात आलं की, बहुतेक प्रजा (अमेरिकन) खालमानेनंच मोबाईलला डोळे लावून वावरते आहे.
असं त्याने तीन महिने केलं म्हणे. म्हणजे आवश्यक तिथे सेलफोनचा वापर त्याने केलाच असेल, पण सारखं त्याच्या ‘अधीन’ होणं टाळलं. अनेकांशी थेट संवाद साधला. त्याने म्हटलं की, आधी मी विशीतल्या पोरासारखा सेलफोनचा वापर करायचो. त्यात थोडा बदल केला आणि आता प्रत्येक उन्हाळ्यात तसंच करायचं ठरवलं. हे सगळंसुद्धा तिकडचं चार वर्षांपूर्वीचं. ‘तिकडे’ आलेली गोष्ट आपल्याकडे कौतुकाची ठरत असेल तर या वेगळ्या विचारावरही (फोन बाजूला ठेवून) विचार करायला वेळ मिळाला तर? प्रयोग करून बघायला हरकत नसावी… मी तसं ठरवतोय…




























































