
सामना ऑनलाईन, मुंबई
शिक्षकांपाठोपाठ आता विद्यार्थ्यांनाही निवडणूक डय़ुटी लावण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शाळांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याच्या सूचना निवडणूक कार्यालयाने शाळांना दिल्या आहेत. या क्लबच्या माध्यमातून पालक आणि समाजामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी निवडणुकीसंदर्भात विविध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक साक्षरता क्लबमध्ये एक शिक्षक नोडल ऑफिसर असणार असून नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षक लीडर म्हणून काम करणार आहेत. मतदारसंघात मतदान केंद्रनिहाय चार स्तरावर हा क्लब स्थापन करण्याच्या सूचना निडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. फ्यूचर व्होटर्स, नवीन मतदार, चुनाव पाठशाला, मतदाता जागरूकता मंच अशा चार स्तरावर या क्लबची रचना करण्यात येणार आहे.
जनगणना 2011 नुसार 6 ते 17 वयोगटातील 30.52 कोटी मुले आहेत. यापैकी 24.1 कोटी मुले शाळांमध्ये दाखल आहेत. ही मुले भावी मतदार असल्याने त्यांच्यात मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना होणार आहे.
असा असेल निवडणूक साक्षरता कार्यक्रम
नोडल अधिकारी असलेल्या शिक्षकांनी निवडणूकसंदर्भात टॉक शो, चित्रकला स्पर्धा, मतदान कार्यशाळा, घोषवाक्य, निबंध स्पर्धा, रॅली व आपल्यातील कल्पनेप्रमाणे इतर स्पर्धा आयोजित करायच्या आहेत. तसेच ज्याद्वारे पालक आणि समाजामध्ये मतदानाविषयी जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढीस लागण्यास मदत होईल.
दहावी, बारावीचे विद्यार्थी सुट्टीवर; शाळांमध्ये वार्षिक परीक्षा
निवडणूक साक्षरता क्लबमध्ये सहभागासाठी विद्यार्थी कसे आणायचे असा प्रश्न शाळांना पडला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर विद्यार्थी सुट्टीवर गेले आहेत. तसेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे. त्यामुळे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम कसे घ्यायचे असा प्रश्न शाळांना पडला आहे.





























































