
सामना प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराच्या दैनंदिन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या केंद्रीय निवडणूक निरीक्षक शिल्पा गुप्ता यांनी आज दिल्या. शिल्पा गुप्ता यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाला भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी उपस्थित होते.
माध्यम कक्ष समन्वयक डॉ. राजू पाटोदकर यांनी माध्यम कक्षात होणाऱया कामकाजाची सविस्तर माहिती शिल्पा गुप्ता यांना दिली. मीडिया मॉनिटरिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग, प्रिंट मीडिया मॉनिटरिंग तसेच पेड न्यूज व एम.सी.एम.सी.चे कामकाज याबद्दल कक्षात होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. त्या वेळी प्रत्येक उमेदवाराच्या जाहिराती, बातम्या, दैनंदिन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना शिल्पा गुप्ता यांनी केली.




























































