जम्मू-कश्मीर : संघाच्या नेत्याची सुरक्षारक्षकासह निर्घृण हत्या, किश्तवाडमध्ये कर्फ्यू लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड येथे एका रुग्णालयामध्ये दहशतवाद्याने गोळीबार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत नेते चंद्रकांत शर्मा यांना निशाणा बनवत केलेल्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुनील सेठी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. शर्मा यांच्यासह त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. बुरखा घालून आलेल्या दहशतवाद्याने रुग्णालयात गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रुग्णालयावरील हल्ल्यानंतर परिसरातील वातावरण तणावाचे असून कर्फ्यू लगावण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक आणि कलम 370 च्या मुद्द्यावरून जम्मू-कश्मीरचे स्थानिक पक्ष दररोज हिंदुस्थानपासून वेगळे होण्याची भाषा करत असतानाच रुग्णालयामध्ये एका हिंदू नेत्याची दहशतवाद्याने गोळी मारून हत्या केल्याने वातावरण तणावाचे आहे. किश्तवाडसह डोडा आणि भद्रवाहमध्ये कर्फ्यू लगावण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारस किश्तवाडातील रुग्णालयामध्ये चंद्रकांत शर्मा आपल्या सुरक्षारक्षकांसह हजर होते. ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत असताना शर्मा यांच्यावर बुरखा घालून आलेल्या व्यक्तीने गोळीबार सुरू केला. गोळीबारामध्ये चंद्रकांत जखमी झाले होते, तर त्यांच्या सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे भाजप प्रवक्ते सेठी यांनी सांगितले.

रुग्णालयामध्ये गोळीबार झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. याचाच फायदा घेत गोळीबार मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकाचे हत्यार घेऊन हल्लेखोराने पळ काढला. अद्याप बुरखा घातलेली व्यक्ती पुरुष होता की स्त्री हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू आहे.