
सामना ऑनलाईन, गोपाळपूर
पहिल्या टप्प्यातील मतदान ज्या मतदारसंघांमध्ये होतंय त्यामध्ये कूचबिहार मतदारसंघाचाही समावेश आहे. औषधांचे दुकान चालवणारी दीपक दास ही 36 वर्षांची व्यक्ती भाजपचा प्रचार घरोघरी करण्याचं काम बसल्याजागी करतेय. दोन मोबाईलच्या आधारे दास हे भाजप कार्यालयाकडून किंवा नेत्यांकडून प्रचाराच्या ज्या गोष्टी सांगतल्या जातील त्या व्हॉटसअॅपवर पाठवत असतो. दास हा तब्बल 1114 व्हॉटसअॅप ग्रुपचा अॅडमिन असून या सगळ्या ग्रुपवर तो मेसेज पाठवत असतो.
दास हे व्हॉटसअॅप अॅडमिन तर आहेच शिवाय ते भाजपच्या आय.टी.सेलचे समन्वयक आहेत. या जिल्हा भाजपचे फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलही सांभाळतात. घरोघरी जाऊन प्रचार करणं दरवेळी शक्य होतंच असं नाही, त्यामुळे सोशल मीडियाद्वारे होणारा प्रचार उमेदवारासाठी फायदेशीर ठरू शकतो. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस दहशतीचे वातावरण निर्माण केलं असल्याने भाजपच्या उमेदवारांना प्रचारात बऱ्याच अडचणी येतात, अशा वेळी सोशल मीडिया हे प्रचाराचे महत्वाचे हत्यार ठरतं असं दीपक दास यांचं म्हणणं आहे.
दास यांच्याकडे दोन मोबाईल फोन आहेत. एका मोबाईलवर 229 व्हॉटसअॅप ग्रुप आहेत तर दुसऱ्या मोबाईलवर 885 ग्रुप आहेत. या सगळ्या ग्रुपमध्ये ते सकाळी 6 वाजल्यापासून मेसेज पाठवायला सुरुवात करतात. पाकिस्तानवर हवाई हल्ला झाला तेव्हा मी सलग 24 तास काम करत होतो असा त्यांनी दावा केला आहे. दास यांनी भाजपसाठी घरोघरी प्रचार केला आहे. हा प्रचार करत असतेवेळी लोकांचे नंबर त्यांनी जमा केले होते, ज्यांचा त्यांना फायदा झाला आहे. ऑनलाईन सदस्य नोंदणीवेळी मिळालेले मोबाईल क्रमांकही त्यांच्या उपयोगी आले. दास यांना भाजपने 10 हजारांचा मोबाईल घेऊन दिला आहे आणि त्यासोबत पोर्टेबल चार्जरही घेऊन दिला आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे घोटाळे, स्कँडल यांच्याबाबत दास यांना लोकांनी माहिती पुरवायला सुरुवात केली आहे. एका नेत्याचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो दास यांना पाठवण्यात आले, ते लगेच त्यांनी व्हायरल केले होते.


























































