
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत 116 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मुंबई शहरात चार उमेदवारांनी तर उपनगरात पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता मुंबईतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील चार टप्प्यांपैकी गुरुवारी विदर्भात पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांत मतदान झाले असून आता तीन टप्प्यांत मतदान शिल्लक आहे. मुंबईत चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून 18, उत्तर-पश्चिम (वायक्य) लोकसभा मतदारसंघातून 21, उत्तर-पूर्व (ईशान्य) 27 व उत्तर-मध्य 20, दक्षिण-मध्य 17, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवारांमध्ये निवडणूक लढती होणार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे व मुंबई शहर जिल्हा प्रसिद्धीमाध्यम कक्षामार्फत देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून राकेश विश्वनाथ अरोरा, उत्तर-पश्चिम (वायक्य) लोकसभा मतदारसंघातून ज्योती सुरेश शेट्टी, उत्तर-पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र वामन वाघमारे, उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून राकेश अरोरा व मुइनुद्दीन यार मोहम्मद खान या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून वारिस अली नसीर अहमद फारुकी व अब्बू देकेंद्र (आरुमुगम एम. देवेंद्र) तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उत्तमचंद राजमल जैन व मो. नईम शेख या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मुंबईत चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 116 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील प्रमुख लढती
- दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना), मिलिंद देवरा (काँग्रेस)
- दक्षिण–मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना), एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
- उत्तर–मध्य मुंबई – पूनम महाजन (भाजप), प्रिया दत्त (काँग्रेस)
- उत्तर–पश्चिम मुंबई – गजानन कीर्तिकर (शिवसेना), संजय निरुपम (काँग्रेस)
- उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी (भाजप), उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
- उत्तर–पूर्व मुंबई – मनोज कोटक (भाजप), संजय दिना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)























































