विद्या संपादनाचा अश्वमेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सूरज पंडित

धर्मशास्त्राचे निर्माणकार एवढीच डॉ. पां. वा. काणे यांची ओळख नव्हती. त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचे अनेक विस्मयकारी पैलू आहेत. धर्मशास्त्राशिवाय प्राचीन भाषा, वाङमय, काव्य, महाकाव्य, अलंकारशास्त्र, भारत विद्येचे अभ्यासक, हिंदू कायद्याचे भाष्यकार, संस्कृतसह फ्रेंच, जर्मन या परकीय भाषांचे अभ्यासक, संशोधक असे किती तरी पैलू सांगता येतील. शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू, ग्रंथकार ते ‘भारतरत्न’ असा त्यांचा प्रवास म्हणजे विद्या संपादनाचा जणू अश्वमेधच होता.

डॉ. पांडुरंग वामन काणे यांचं नाव घेतलं की धर्मशास्त्र आपोआपच जोडलं जातं. धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास हा ग्रंथ प्रसिद्ध करत प्राचीन संस्कृत वाडमयाचा अभ्यास आणि कायदेविषयक जाण आणि सामाजिक भान अशा वेगवेगळ्या टप्प्यांना त्यांनी एकत्र सांधलं. कायद्याची तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा सखोल आणि कालानुरूप अभ्यास, प्रत्येक मांडणीला शास्त्रभूत आधार अशा मजबूत निकषांवर केलेली धर्मशास्त्राची मांडणी त्यामुळेच कालातीत ठरली आहे. धर्मशास्त्राचे निर्माणकार ही पां. वा. काणे यांची ओळख ठरली असली तरी त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचे अनेक विस्मयकारी पैलू आहेत. हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथासाठी काणेंना अनेक सन्मान मिळाले पण फक्त एक अभ्यासक म्हणून त्यांची ओळख मर्यादित नव्हती. प्राचीन भाषा, वाडमय, काव्य, महाकाव्य, अलंकारशास्त्र, हिंदू कायद्याचे भाष्यकार, भारत विद्येचे अभ्यासक म्हणून त्यांचे योगदान मोलाचे आहे.

डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांचा जन्म ७ मे १८८० रोजी कोकणातील चिपळूणमधील परशुरामपेढे या लहानशा गावात झाला. वेदशास्त्रपारंगत अशी कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या डॉक्टर पां. वा. काणे यांना मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असताना संस्कृतमध्ये सात सुवर्ण पदके मिळाली होती. त्यांच्या संस्कृतमधील योगदानाबद्दल त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी देण्यात आली होती. कुरुक्षेत्र विद्यापीठात भारतविद्येचा अभ्यास सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. संस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेचा अभ्यास अशा सर्वच क्षेत्रात अभ्यास करत स्वतःचा ठसा उमटवला. १९५६ साली त्यांना त्यांच्या ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. हा ग्रंथ आजही प्राचीन भारतीय कायदेव्यवस्था आणि नियमावलीबाबत प्रमाण मानला जातो.

प्राचीन तसंच मध्ययुगीन भारतात धार्मिक आणि नागरी कायदेव्यवस्था कशी होती याबाबतचा ज्ञानकोषच एकप्रकारे डॉ. काणेंनी तयार केला होता. आजही या विषयाच्या अभ्यासासाठी या ग्रंथाला पर्याय नाही. १९६३ मध्ये भारतरत्न हा हिंदुस्थानातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. स्वतः उच्चशिक्षित असलेल्या काणेंनी शिक्षक म्हणूनही मोठं काम केलं. रत्नागिरीच्या सरकारी शाळेपासून सुरूवात करत डॉ. काणे मुंबईत आले. मुंबईत सरकारी शाळेतील शिक्षक ते भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरव हा दीर्घ पल्ला त्यांच्या अभ्यासू, संशोधक वृत्तीमुळेच गाठा आला. त्यांच्यातील शिक्षकी पेशा शेवटपर्यंत कायम राहिला. एल्फिन्स्टन आणि विल्सन यांसारख्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. डॉक्टर काणे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातही अध्यापन केले होते.

उत्तररामचरित (१९१३), कादंबरी (२ खंड, १९११ व १९१८), हर्षचरित (२ खंड, १९१८ व १९२१), हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स (१९५१) आदी ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. या साऱ्याची सुरुवात १९३० च्या दशकात झाली. त्यांनी ‘व्यवहारमायूख’ या ग्रंथासाठी प्रस्तावना लिहिण्याचे काम हाती घेतले. यातूनच अनेक हस्तलिखिते व ग्रंथ अभ्यासत त्यांनी एका मोठ्या संशोधन प्रकल्पाची सुरुवात केली. याच संशोधन प्रकल्पाचे फलित म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या ग्रंथाचे खंड. यापैकी पहिला खंड १९३० मध्ये प्रकाशित झाला. साधारण साडेसहा हजार संख्या असलेले हे लिखाण १९६२ पूर्णत्वास गेले. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई व भांडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टीट्यूट या दोन संस्थांच्या सहाय्याने त्यांनी हा संशोधन प्रकल्प उभा केला व पूर्णत्वास नेला. ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या ग्रंथाचे विविध भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.

पुराण, महाकाव्य, इतिहास परंपरा, स्मृती, निबंधग्रंथ, अशा अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून डॉक्टर पां. वा. काणे यांनी भारतीय समाजव्यवस्था, नीतीव्यवस्था, कायदेव्यवस्था अशा विविध सांस्कृतिक अंगांना स्पर्श करणाऱ्या या खंडांचे लिखाण केले. यासाठी शेकडो हस्तलिखिते, ग्रंथ यांचा कालक्रम ठरवून त्यात परार्वितत होणाऱ्या संस्कृतीच्या विविध आयामांची चर्चा त्यांनी केली. आजही त्यांच्या या ग्रंथाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग केला जातो. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये त्यांच्या नावाने भारत विद्या व संस्कृत अध्ययनासाठी सर्मिपत अशी एक संस्था कार्यरत आहे. तेथे संशोधनाबरोबरच यांच्या नावाने दरवर्षी एक व्याख्यान व एक परिसंवाद अथवा चर्चासत्र आयोजित केला जातो. यातूनच त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते. १८ एप्रिल हा या महान विद्वान आणि प्रकांड पंडिताचा स्मृतिदिन. धर्मशास्त्राचे निर्माणकार डॉ. पां. वा. काणे यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे जणू विद्या संपादनाचा अश्वमेधच म्हणावा लागेल.

[email protected]