…तर हिंदुस्थान शिल्लकच राहिला नसता!-फारुख अब्दुल्ला बरळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। श्रीनगर

अब्दुल्ला आणि मुफ्ती यांचे कुटुंबीय देश तोडायला निघाले आहेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना नॅशनल काँन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला सोमवारी पुन्हा बरळले. ते म्हणाले की, देश तोडायचाच असता तर हा देश राहिलाच नसता. कठुआ जिह्यात रविवारी पंतप्रधान मोदी यांनी एका प्रचारसभेत फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर आरोप केले होते. अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोघांच्याही कुटुंबीयांनी जम्मू-कश्मीरमधील तीन पिढय़ा बर्बाद केल्या, पण आम्ही देश तोडू देणार नाही, असेही मोदी म्हणाले होते.

मोदींच्या वक्तव्यावर पलटवार करताना फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले, आमचा पक्ष लोकांचे भले करण्यासाठी लढतो. मग ते मुस्लीम असो, हिंदू असो, शीख असो की ख्रिश्चन… आम्ही भलाईसाठी लढतो. मोदी यांनी पूर्ण ताकद लावली तरी ते हिंदुस्थान तोडू शकणार नाहीत. आमच्या कुटुंबीयांबद्दल काहीही बोललात तरी आम्ही डगमगणार नाही. आम्हाला जर देश तोडायचा असता तर आतापर्यंत हिंदुस्थान शिल्लकच राहिला नसता.

कठीण समयी आम्ही निवडणूक लढलो

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, 1996 साली जेव्हा कुणीही निवडणुकीसाठी तयार नव्हते, त्या कठीण समयी आम्ही निवडणूक लढलो. तेव्हा माझ्या सहकाऱयांनीही मला म्हटले की, आत्ता निवडणूक लढवणे ठीक होणार नाही. पण जनता कष्टातून बाहेर यावी असे मला वाटत होते. मी धीराने निवडणूक लढायला पुढे झालो. मोदींनी हे कधी विसरता कामा नये.