क्रॉफर्ड मार्केटमध्ये होणार अंडरग्राऊंड पार्किंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ऐतिहासिक महात्मा जोतिबा फुले मंडईमधील (क्रॉफर्ड मार्केट) च्या ‘फेज-2’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी पुनर्विकासात मंडईत दुमजली अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 198 गाड्या आणि 20 लॉरी यांच्यासाठी ही पार्किंग व्यवस्था असेल. यामुळे फोर्ट परिसरातील वाहतुकीचा कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे.

पालिकेच्या माध्यमातून हेरिटेज क्रॉफर्ड मार्केटचा ‘फेज-1’ आणि ‘फेज-2’ अशा दोन टप्प्यांत पुनर्विकास करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. 2008 मध्ये हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी भेट देऊन तपासणी करण्यात आली. यामध्ये क्रॉफर्ड मार्केटला ‘हेरिटेज – 1’चा दर्जा असल्याचा अहवाल देत दुरुस्ती, पुनर्विकास सुचवला होता. यानुसार सप्टेंबर 2014 पासून ‘फेज-1’च्या पुनर्विकासाचे काम करून 2018 मध्ये काम पूर्णही करण्यात आले. मात्र ‘फेज-2’च्या पुनर्विकासाबाबत या ठिकाणच्या गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे काम रखडले होते. पालिकेच्या बाजार विभागाने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडल्याने आता पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

प्रशस्त गार्डन, हेरिटेज फाऊंटन
सहा एकर जागेत असलेल्या आणि पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासात दुमजली पार्किंग बांधण्यात येणार आहे. यामध्ये मालगाड्या भरण्यासाठी आणि रिकाम्या करण्यासाठी जागा ठेवण्यात येईल. त्यामुळे परिसरात मालवाहू गाड्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीतून सुटका होणार असल्याचे सहायक आयुक्त संगीत हसनाळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे मार्केटमध्ये अद्ययावत गार्डन, हेरिटेज फाऊंटनही होणार असल्याची माहिती हसनाळे यांनी दिली.

असे आहे प्रकरण
2004 च्या धोरणानुसार पालिकेकडून 12 मार्केट असोसिएशनच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचे धोरण आखण्यात आले. मात्र क्रॉफर्ड मार्केटच्या विकासात पालिकेचे नुकसान होत असल्यामुळे आणि असोसिएशनकडून हेरिटेजनुसार काम होत असल्यामुळे स्वतः पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 2018 मध्ये फेज-1चे काम पूर्ण झाले असून 502 जणांना गाळेही वितरित करण्यात आले आहेत. एकूण सहा एकरच्या जागेत होणाऱ्या पुनर्विकासात एकूण 1097 दुकानांपैकी उर्वरित गाळेधारकांना जागा दिली जाईल.