तिसऱ्या टप्प्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात, आज माणगावात सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-new

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील धडाकेबाज प्रचारानंतर तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 18 एप्रिल रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यातून तिसऱ्या टप्प्यातील लढतीसाठी शिवसेनेचा प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे.

  • शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवार 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सावरकर चौक, पार्वती हॉटेलसमोर देवरुख येथे प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ग्रामीण रुग्णालय मैदान, कणकवली येथे उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
  • संभाजीनगर येथील शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शनिवार 20 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिलला सायंकाळी 6.00 वाजता इचलकरंजी येथे सभा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सायंकाळी 8.00 वाजता शिवराज महाविद्यालय मैदान गडहिंग्लज कोल्हापूर येथे सभा होणार आहे.
  • सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी 21 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजता सातारा येथे प्रचार सभा होणार आहे.

आज माणगावात सभा
विदर्भ, मराठवाडा, नगर आणि मुंबईतील तडाखेबंद सभांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रायगडातील जाहीर सभा बुधवारी माणगाव येथील टिकम मेहता कॉलेजच्या विस्तीर्ण पटांगणावर दुपारी 4 वाजता होणार आहे. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची झंझावाती सभा होणार आहे. या सभेला शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, भाजप आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.