
सामना ऑनलाईन । मुंबई
जम्मू-कश्मीरमध्ये वैष्णोदेवीकडे जाणारा मार्ग हा पहाडी आहे. अनेक भाविकांना, विशेषकरून वयोवृद्धांना तिथे पालखीचाच आधार घ्यावा लागतो. पालखीवाल्यांसाठी या जड लोखंडाच्या या पालख्या खांद्यावर घेऊन पहाडवाट चढणे म्हणजे दिव्यच. पवईच्या आयआयटी मुंबईतील संशोधक या पालखीवाल्यांसाठी देवच ठरणार आहेत. त्यांनी वजनाने हलक्या आणि तितक्याच टिकाऊ अशा पालख्या बनवल्या आहेत ज्या वाहून नेताना पालखीवाल्यांची पूर्वीप्रमाणे दमछाक होणार नाही.
आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरमधील (आयडीसी) संशोधकांनी अशा 53 पालख्या बनवल्या आहेत. लवकरच त्या वैष्णोदेवी येथील पालखीवाल्यांना सोपवल्या जाणार आहेत. सध्या तिथे लोखंडाच्या पालख्या वापरल्या जातात. त्या एका पालखीचे वजन 45 किलो आहे. त्यात भाविक बसला की ते 100 किलोवर जाते. इतके वजन खांद्यावर घेऊन चार जण कटरा ते वैष्णोदेवी असा 13 किलोमीटरचा मार्ग चालून जातात.
आयआयटीच्या संशोधकांनी बनवलेल्या पालखीचे वजन 34 किलो आहे. या पालख्या बनवण्यासाठी त्यांनी स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे. ही पालखी मजबूत आहे आणि पालखीवाल्यांना संतुलन साधता येईल अशी लवचिकही आहे. पालखीवाल्यांना हलकी आणि भाविकांना आरामदायी अशी ही नवी पालखी असल्याचे संशोधकांनी सांगितले. वैष्णोदेवीनंतर महाराष्ट्र आणि देशाच्या अन्य भागांतील तीर्थस्थळांसाठीही या पालख्या वापरल्या जाऊ शकणार आहेत.




























































