
बुलढाणा । राजेश देशमाने
‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी थ्री टायर दर्जाची सशस्त्र सुरक्षा यंत्रणा मतदान यंत्र ठेवलेल्या सहा स्ट्राँग रुमला तैनात करण्यात आली आहे. जवळपास २५ अधिकार्यांसह दोनशे कर्मचार्यांची सीआरपीएफ, एसआरपी जवानांसह स्थानिक पोलीस बंदोबस्त दिवसरात्र असे ३४ दिवस २३ मे पर्यंत तैनात राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘सामना’ शी बोलताना दिली आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सरासरी अंतिम ६३.५३ टक्के मतदान झाले असून मागील २०१४ च्या तुलनेत २.१८ टक्के मतदान जास्त झाले आहे. अंतिम मतदानाची आकडेवारी हाती आली असून बुलढाणा विधानसभा मतदार संघात ५५.३९, चिखली मतदार संघात ६२.७५, सिंदखेडराजा मतदार संघात ६३.७८, मेहकर मतदार संघात ६४.७८, खामगाव मतदार संघात ६७.७६, जळगाव जामोद मतदार संघात ६७.४४ टक्के मतदान झाले आहे. सर्व सहाही विधानसभा मतदार संघाचे मतदान यंत्र बुलढाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इमारतीमध्ये सहा विधानसभानुसार स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहे. या स्ट्राँगरुमला कोणतीही खिडकी नसून केवळ एक दरवाजा आहे. दरवाजे सिल केले असून सिलवर व रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. त्याचसोबत थ्रीटायर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
पहिल्या टायर रुमच्या बाजुला एक अधिकारी व ३० सीआरपीएफ जवान तैनात आहे. दुसरी टायर सुरक्षा यंत्रणा एक अधिकारी ३० कर्मचारी एसआरपी सशस्त्र जवान तैनात आहे. तिसरी टायर बाहेरील सुरक्षा व्यवस्था स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधिक्षक, एक उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरिक्षक, १२ पोलीस उपनिरिक्षक, १५० सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत इमारतीच्या चारही बाजुने सहा मचानावरुन दुर्बिणीच्या सहाय्याने टेहळणी होणार आहे. त्याच सोबत तिथे कंट्रोलरुम उभारण्यात आली आहे. येणार्या जाणार्या अधिकार्यांच्या वाहनांची नोंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद करण्यात आला आहे. रात्रंदिवस या संपूर्ण परिसरावर सुरक्षा राहणार असल्यामुळे ‘परिंदाभी पर नही मार सकता’ अशी ही यंत्रणा आहे. ३४ दिवस ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक भुजबळ यांनी सामनाला दिली आहे.





























































