चिखलीत भंदे, वगदी मिरवणुकीने रेणुकामातेच्या यात्रेला प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिखली (जि. बुलढाणा)

चिखली येथील श्री रेणुकामाता मंदिर प्राचीन असून स्वयंभू जागृत शक्तीपीठ म्हणून प्रचलित आहे. चैत्र शु. पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवाचा दिवशी श्री रेणुका मातेची मोठी यात्रा भरते. यामध्ये प्रामुख्याने झेंडा मिरवणूक, भंदे मिरवणूक, मंदिराला वगदी मिरवणूक, चर्मकार बांधवांची जिव्हा मिरवणूक, देवीचे वाहन मिरवणूक इत्यादी कार्यक्रमांनी यात्रेला प्रारंभ झाला आहे.

आज १९ एप्रिल रोजी प्रातःकाळी अभिषेक व नवरात्र उत्थापन करण्यात आले. शेलूद येथील मनाचे पातळ अर्पण करण्यात आले. नवसपूर्ती झेंडा मिरवणूक, गळकरी वगदी मिरवणूक, ऑटो रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, बियाणी महामंडळ संघटना, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयीन बंधू, अडत दुकानदार, हमाल संघटना व इतर संघटने तर्फे खण, पातळ अर्पण करण्यात आले. यात्रेनिमित्त शहरातील बँका, पतसंस्था, मित्र मंडळ गणेश मंडळ, नवरात्र दुर्गा मंडळ, व्यापारी संघटना महिला मंडळ आदी तर्फे ठिकठिकाणी पाणपोई, सरबत, फराळ व महाप्रसाद वाटप करण्यात आली आहे. तसेच तिथीनुसार चर्मकार बंधू भगिनीची जिव्हा त्रिशूलधारी मिरवणुकीसह नवसपूर्ती आदी कार्यक्रम होत आहे.

आज सकाळी शेलूद, चांधई व चिखली येथील दोन अशा एकूण चार वगदी सकाळी १२ वाजता चिखली येथील देवी मंदिराजवळ पोहोचून मंदिराला प्रदक्षिणा मारुन दुपारनंतर ही वगदी मिरवणूक समाप्त झाली. देवीला बोललेला नवस फेडण्याच्या अनेक पध्दती आहेत. यातील एक पध्दत म्हणजे वगदी होय. आपले मनोरथ पूर्ण झाले की वगदीला लटकून देविच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात. यासाठी असलेली वगदी लाकडापासून तयार केली जाते. उभ्या खांबावर आडवे दांडे आणि त्याला गळ बांधलेला असतो. या गळाला लटकून भाविक मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात. ही वगदी बैलगाडीवर चढवली जाते. वगदीला लटकलेल्या नवस फेडण्यार्‍या भाविकाला ‘गळकरी’ म्हणतात. आज सायंकाळी ७ वाजता वहन व शोभा यात्रा मिरवणुकीला आरतीनंतर मंदिरासमोरून प्रारंभ होणार आहे.