“…तर तुमच्या आई-बहिणीला उचलून आणू” आमदाराची जीभ घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानच्या सीकर इथून चार दिवसांपूर्वी एका नवविवाहितेचं अपहरण झालं होतं. या प्रकरणी एका आमदाराने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ‘जर पोलिसांनी या अपहृत तरुणीचा छडा लावला नाही, तर आरोपींच्या आई-बहिणीला उचलून आणू’, असं वक्तव्य या आमदाराने केलं आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, राजेंद्र सिंह गुढा असं या नेत्याचं नाव असून तो बसपाचा आमदार आहे. 16 एप्रिल रोजी सीकर येथून एका नवविवाहितेचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली होती. अपहृत तरुणीचा छडा लवकरात लवकर लावावा या मागणीसाठी गुढा गेले काही दिवस सीकरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसला आहे. या ठिय्या आंदोलनात जमलेल्यांसमोर भाषण देताना गुढा म्हणाला की, प्रशासनाला दिलेली मुदत संपली आहे. त्यांनी आमच्या बहिणीला शोधलेलं नाही आणि आरोपींनाही अटक झालेली नाही. हे जर असंच सुरू राहिलं तर आरोपींच्या आई-बहिणीला आम्ही उचलून आणू, असं आक्षेपार्ह वक्तव्य गुढा याने यावेळी केलं. या ठिय्या आंदोलनात गुढा याने आरोपींच्या अटकेची मागणी करत स्वतःला पेटवून द्यायचा प्रयत्नही केला होता. आता या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

या वक्तव्यानंतर सीकरचे पोलीस अधीक्षक अमनदीप सिंह कपूर यांनी अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्यं करू नयेत असं आवाहन केलं आहे. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जातो, असं कपूर यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी अपहरण प्रकरणाचा छडा जवळपास लावला असून आरोपींच्या अटकेसाठी पाच पोलीस पथकं पाठवण्यात आल्याची माहितीही कपूर यांनी दिली आहे.