उन्हाचा पारा चढला; मराठवाडय़ात उष्णतेची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । परभणी

महिनाभर तापलेला निवडणुकीचा पारा खाली उतरताच उन्हाचा पारा चढला आहे. मराठवाडय़ात उष्णतेची जबर लाट आली असून परभणीचे तापमान 42.5 अंशावर पोहोचले आहे. आठवडाभरात तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईत 34.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मात्र चटके कायम होते. अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱयांमुळे मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघाला.

गेला महिनाभर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले होते. मतदान होताच राजकारणाचा पारा घसरला आणि उन्हाने आपला रंग दाखवला. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडय़ावर सूर्य आग ओकत आहे. पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून परभणीत आज तापमान 42.5 एवढे नोंदले गेले. प्रचंड उष्मा जाणवत असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नागरिकांनी शक्यतोवर घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मराठवाडय़ात संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशीव जिह्यांतही उष्णतेच्या लाटेचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. जबर उन्हामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. उष्णतेमुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून दवाखान्यांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. उन्हाचा तडाखा जनावरांनाही बसत आहे. अगोदरच चारापाण्याचे वांधे असल्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. चाराच नसल्यामुळे शेतकऱयांनी जनावरांची रवानगी छावण्यांमध्ये केली असली तरी तिथेही पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत.

  • संभाजीनगर …41.5
  • जालना….. 42.7
  • परभणी … 42.5
  • बीड…….. 41.8
  • नांदेड…… 42.4
  • हिंगोली…. 42.8
  • लातूर…… 40.0
  • धाराशीव.. 40.9