विद्युत जोडणीही नाही अन् सोलार पंपही नाही: परभणी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोलार पंपाच्या नावाखाली राज्य विद्युत मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने एकही नव्याने विद्युत जोडणी दिली नाही. विशेष म्हणजे नियमांनुसार शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे विद्युत जोडणी देणे बंधनकारक असतानाही विद्युत मंडळाने विद्युत जोडणी चक्क बंद करुन टाकली आहे. सोलार पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, असा एकच धोशा शेतकऱ्यांच्या पाठीशी विद्युत मंडळाने लावल्याने जिल्ह्यातील शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. आता याप्रकरणी शिवसेनेला लवकरच तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे.

विद्युत मंडळाकडून मागील सहा महिन्यापासून शेतकऱ्यांचे कोटेशन विज जोडणीसाठी भरुन घेतले जात नाही. शेतकरी विद्युत मंडळाच्या कार्यालयात दररोज येतात आणि विज जोडणीसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुजोर व मस्तवाल अधिकारी या शेतकऱ्यांना आल्या पावली विद्युत मंडळाच्या कार्यालयातून काढून देतात. सध्या राज्य शासनाने नवीन वीज जोडणी बंद केली असल्याचे कारण देतात. तसेच सोलार पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, असा सल्ला दिल्या जातो. शेतकऱ्यांनी ऑनलाईनवर सोलार पंपासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना अर्ज स्वीकारल्याचा एसएमएस सुद्धा येतो. परंतु त्यानंतर मात्र काही दिवसांनी अर्जात त्रुटी असल्याचा एसएमएस येतो. तसेच अर्ज नाकारत असल्याचेही सांगीतले जाते. आपल्याकडे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही, असेही एक कारण शेतकऱ्यांना बजावल्या जाते. त्यामुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यात नव्याने इंधन विहिर घेणाऱ्या व नवी विहिर खोदणाऱ्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणीही मिळाली नाही आणि सोलार पंपही मिळाला नाही.

काही गुत्तेदार मंडळी मात्र विद्युत मंडळाच्या गुत्तेदारीवर तर्राट झाले आहेत. एकेकाळी दुकानांवर नौकरी करणारे विद्युत मंडळाच्या गुत्तेदारीवर थोर समाजसेवक झाल्याचा आव आणत आहेत. वर्षानुवर्ष गुत्तेदारी केल्यामुळे आणि त्यात त्यांचा दांडगा अनुभव असल्यामुळे सराईत झालेल्या गुत्तेदारांनी आता जो शेतकरी ठरवून जास्त पैसे देईल, त्या शेतकऱ्याला तातडीने १.३ अंतर्गत पोल टावूâन गतीने विद्युत जोडणीही करुन दिली जाते. बाकी शेतकरी मात्र उदास मनाने विद्युत मंडळाच्या कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.

दरम्यान, या विद्युत मंडळाच्या या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे अनेक शेतकऱ्यांचे यंदाचे विद्युत जोडणीचे प्रस्ताव वाया गेले असून त्यांना या उन्हाळी हंगामात वीज जोडणी नसल्यामुळे पाणी उपलब्ध असूनही कोणतेही पीक अथवा भाजीपाला घेता आला नाही. आधिच दुष्काळाची स्थिती आणि त्यात विद्युत मंडळाची ही उदासीन भूमिका यामुळे शेतकरी आधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडे विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी केल्या असून त्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लवकरच शेतकऱ्यांसाठी राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.