अतिरिक्त उत्खनन करून उत्खननकर्ता फरार: गरीब आदिवासी बनणार बळीचा बकरा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

मुंबई गोवा महामार्गावरील आंबिवली गावानजिकच्या माती उत्खननकर्त्याने किरकोळ रॉयल्टी भरून हजारो ब्रास अतिरिक्त मातीचे उत्खनन केले असून या संदर्भात येथील सरपंच, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी प्रांत कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनानला जाग आली मात्र कारवाई बडगा उभारल्या बरोबर उत्खननकर्त्याने पलायन केल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली आहे.

आंबिवली येथील अतिरिक्त उत्खनन संदर्भात तक्रार दाखल होताच शासकीय अधिकाऱ्यांना जाग आली. उत्खननकर्त्याची मशनरी डंपर जेसीबी जप्त करण्याची गोपनीय माहिती असताना ती माहिती उत्खननकर्त्यापर्यंत कशी गेली? सदर माहिती मिळाल्यामुळेच कारवाईच्या भीतीने उत्खननकर्त्याने तात्काळ जेसीबी,डंपर व इतर मशनरी घेऊन त्या जागेवरून पलायन केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

सदर उत्खननकर्त्याने जानेवारी 2019 पर्यंत अतिरिक्त 16000 ब्रास मातीचे उत्खनन केल्याने त्यांच्या दंडाची रक्कम सुमारे 4 कोटी 85 लाखांची असुन तशी नोटीस बजावण्यात आली. एवढेच नव्हे तर माती उत्खनन केलेल्या जागी पाहणी करताना मंडळ अधिकारी, तलाठी, आंबिवली सरपंच व ग्रामस्थ गेले असता सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी उर्वरित मोजणी जीपीआरएस किंवा एटीएस मशिनद्वारे करून पुन्हा दंड आकारण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी पंचनामाही करण्यात आला. उत्खननकर्ता पळून गेल्याने उर्वरित उत्खननाची रॉयल्टी व दंड मिळुन सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचा भार जमिनधारक गोरगरीब आदिवासींवर पडणार असल्याने गरीब आदीवाशींना बळीचा बकरा बनवणार असल्याचा आरोप बेकावडे यांनी केला.

गेली कित्येक महिने रात्रंदिवस चालू असलेले उत्खननाकडे शासकीय अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली यामुळे शासनाचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडाला असुन दंडाची वसुली संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून करावी अशी मागणी बेकावडे यांनी केली.