
सामना ऑनलाईन । लंडन
पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांना ठकविणारा प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी याची लंडन येथील वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आज 24 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या घोटाळय़ाप्रकरणी त्याला 19 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो तुरुंगात आहे. व्हिडीओ लिंकद्वारे आज त्याला पुढील रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बथनाट यांनी त्याला 24 मेपर्यंत कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. 24 तारखेलादेखील तुला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येईल, मात्र सविस्तर सुनावणीसाठी 30 मे ही तारीख निश्चित करण्यात आली असून त्या दिवशी तुला न्यायालयात प्रत्यक्ष हजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे मॅजिस्ट्रेटस् अर्बथनाट म्हणाल्या. तसेच रिमांडबद्दल काही सांगायचे आहे काय अशी विचारणी केली त्यावेळी नीरवच्या वकिलांनी नकारार्थी उत्तर दिले.
चोक्सीच्या लक्झरी कार्सचा 3 कोटी 29 लाखांना लिलाव
याच घोटाळा प्रकरणातील दुसरा एक आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी हादेखील परदेशात पळून गेला आहे. घोटाळय़ाची ही रक्कम वसूल करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या मामा-भाच्याच्या एकूण 13 आलिशान गाडय़ांचा 3 कोटी 29 लाखांत लिलाव केला. या सर्व गाडय़ांवर पीएमएलए न्यायालयाने आधीच टाच आणली होती.
गबाळय़ासारखा उभा असलेल्या नीरवने फक्त नाव उच्चारण्यापुरते तोंड उघडले
फिकट तपकिरी तसेच काळय़ा रंगाचा स्वेटर घातलेल्या नीरव मोदीला आज जेव्हा व्हिडीओ लिंकद्वारे न्यायालयात हजर केले तेव्हा तो मागच्या सुनावणीपेक्षा दुर्मुखलेला दिसला. विस्कटलेले केस तसेच गबाळय़ासारखा उभा असलेल्या नीरव मोदीने फक्त स्वतःचे नाव उच्चारण्यापुरते तोंड उघडले. मोदी याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची 28 दिवसांची मुदत येत्या 24 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर त्याचे प्रकरण फुल केस मॅनेजमेंट हियरिंगसाठी बोर्डावर येणार आहे. त्यामुळे 24 मे रोजी ती प्रक्रिया सुरू करावी लागणार असल्याचेही मॅजिस्ट्रेट अर्थबनाट म्हणाल्या.

























































