अजिंठा @ 200 वर्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेंद्र ज. महाजन

जागतिक कला वारसास्थळात युनेस्कोने हिंदुस्थानातील पहिल्या पाचांत निवडलेल्या अजिंठा लेण्या तर अद्वितीय कलातीर्थ होय. या लेण्या आपला सन्मान आहे. अभिजात भित्तीचित्रण कलेचे अहेवपण जपलेल्या या लेण्यांच्या शोधाला या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. दहा शतके विजनवासात गेलेल्या या लेण्यांतील कलाबीज किती अभिजात होते, तत्कालीन समाजाचं जगणं किती समृद्ध अन् उच्च पातळीवरचे होते याचे समग्र दर्शन या लेण्यांतून घडते. शोधानंतरच्या दोन शतकी प्रवासात अजिंठा लेण्यातील कलासौंदर्य मूल्ये समजून घेताना हा संपन्न कला वारसा आपण कसा सांभाळलाय याची चर्चा लेखकाने केली आहे.

हिंदुस्थानात एकूण 1200 लेण्या आहेत. त्यापैकी 800 च्या वर लेण्या एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. डोंगर खोदून, पोखरून, कोरून या लेणीनिर्माणाची सुरुवात इ.स. पूर्व तिसऱया दशकात सम्राट अशोकाने केली. यातील बहुतांश लेण्या बौद्धधर्मीय आहेत. या लेण्यांमधील वास्तू-शिल्प-चित्रकलावशेष आजच्या आधुनिक कलावंतांना स्तीमित करणारे आहे. येथे एकूण 30 लेण्या आहेत. त्या सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्या बौद्ध भिक्खूंच्या प्रार्थनेसाठी चैत्य तर उर्वरित 25 लेण्या निवासासाठी विहार स्वरूपाच्या आहेत. 9, 10, 12, 13 व 15 या लेण्या प्रतीकांनी बौद्ध अस्तित्व दर्शविणाऱया हिनयान, तर 1 ते 7, 11, 14 ते 30 या लेण्या बुद्धांचे मानवी स्वरूप दर्शविणाऱया महायान पंथाच्या आहेत. या सर्व लेण्या इ.स.पूर्व दुसऱया ते इसवी सनानंतर सातव्या शतकापर्यंत निर्माण झाल्या. या लेण्यांतून वास्तुशिल्पचित्रकलेचा परिपूर्ण कलाविष्कार बघावयास मिळतो. मात्र अजिंठा लेण्या जगप्रसिद्ध आहेत त्या येथील अभिजात भित्तीचित्रांसाठीच.

सन 1879 मध्ये केलेल्या तज्ञांच्या पाहणीत येथे 16 लेण्यांमधून चित्रे होती, पण काळाच्या ओघात निसर्गाच्या आघातांसह माणसांच्या विध्वंसक प्रवृत्तीमुळे आज फक्त 1, 2, 9, 10, 16 व 17 या सहा लेण्यांमधूनच भित्तीचित्रे बऱयापैकी तगून आहेत. 9 व 10 लेण्यांतील भित्तीचित्रे सर्वांत प्राचीन, पहिल्या 10 मधील फक्त स्तंभावरील चौथ्या आणि 16 व 17 मधील पाचव्या, तर 1 व 2 मधील चित्रे अलीकडची म्हणजे सातव्या शतकातील आहेत. यातील बहुतांश गुप्तराजांच्या समकालीन वाकाटकांच्या काळात काढली गेली. शिबी, शंखपाल, महाजनका, रुरू, चंपेय, महाकपी, विदुरपंडित, हस्ती इ. बुद्धाच्या पूर्व जीवनातील जातककथा, मायादेवीचे स्वप्न, पद्मपाणि बोधिसत्त्व, मारविजय, नलगरी हत्तीचे दमन, ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाचे घरी आगमन इ. वास्तविक जीवनातील प्रसंगचित्रण, दुसरा पुलकेशीन राजा इराणी सम्राट खुश्रू पर्वेझ यांच्या वकिलाचे दरबारात स्वागत करतानाचा एकमेव ऐतिहासिक प्रसंग, यासह शृंगारमग्न यौवना, अप्सरा, वेणीफणी करणारी, भोवरा फिरवणारी मुले, पाठशाळा, मडकी घडविणारा कुंभार, बैलगाडीसह शेतकरी, कोंबडय़ांची झुंजादी तत्कालीन लोकजीवनातील धर्मनिरपेक्ष दैनंदिन विषयांचे चित्रण दिसते. यातील अर्धअनावृत्त या झिरझिरीत वस्त्रांतून शरीरघाट दिसणाऱया सडसडीत बांध्याच्या, केशभूषांच्या विविधतेने नटलेल्या, अलंकारांनी सजलेल्या, वैशिष्टय़पूर्ण पागोटे घातलेल्या रेषेदार स्त्री-पुरुष आकृत्या, त्यातून झळकणाऱया करुणा, क्षमा, शांती, त्याग, दुःख, हर्ष, संयम, शृंगारादी भावदर्शनाचे प्रकटीकरण रसिकांना मोहून टाकते. अभिजात चित्रकारांना मार्गदर्शन करणाऱया रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, साहस्य, वर्णिका या षडांगाच्या प्रभावी वापराने इथल्या आकृत्या जिवंत भासमान होताना दिसतात. या व्यतिरिक्त छत, भिंती, स्तंभावर असंख्य पाने, फुले, पशू, पक्षी व आज आधुनिक वाटाव्यात अशा भौमितिक आकारांच्या छटात्मक संकल्परचना येथे वेधक रंगसंगतीसह साकारलेल्या दिसतात.

अलंकारिक, प्रवाही रेषामाधुर्याने नटलेल्या, सपाट रंगलेपणातून भावनांचा संयत आविष्कार साकारणाऱया या अजिंठा लेण्यांतून 27 च्या आसपास चित्र व शिलालेख बघावयास मिळतात. त्यात वाकाटक राजा हरिषेणासह अन्य देणगीदारांची नावे आहेत. लेण्यांच्या शोधकर्त्यांनीही 10 व्या लेण्यातील एका स्तंभावर 28 एप्रिल 1819, 28, मद्रास कॅव्हलरी, जॉन स्मिथ’ असे नाव कोरलेले आहे. मात्र सात शतके या लेण्या खोदणाऱया, कोरणाऱया, सजविणाऱया एकाही कलावंतांचा साधा उल्लेख आढळत नाही. किती ही निर्मळ निर्व्याजता! जॉन स्मिथ यांनी ब्रिटिश शासनाला या अद्भुत लेण्यांची माहिती कळवली. सर जेम्स ई. अलेक्झांडर यांनी सन 1824 ला अजिंठय़ाला भेट दिली. सन 1829 ला त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडन येथे रिपोर्ट सादर केला व तेथेच सन 1843 ला त्यांनी शोधनिबंध वाचला. सन 1844 मध्ये डायरेक्टर्स ऑफ द कोर्ट ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीमार्फत सैन्य अधिकारी व ब्रिटिश चित्रकार मेजर रॉबर्ट गील यांची अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती करण्यासाठी नियुक्ती झाली. त्यांनी 17 वर्षे खपून 33 च्या वर भव्य प्रतिकृती केल्या आणि त्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे सन 1866 ला प्रदर्शित झाल्या. त्यातील पाच वगळता बाकी सर्व आगीत भस्मसात झाल्या. सन 1872 मध्ये सर जेम्स फर्ग्युसन, डॉ. जेम्स बर्जेस यांच्या सांगण्यानुसार तत्कालीन बॉम्बे स्कूलचे प्राचार्य (आताचे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट) जॉन ग्रिफिथ्स यांनी पेस्तनजी बोमनजी, जगन्नाथ अनंत, एन. राघवादि प्रतिभावान विद्यार्थ्यांना घेऊन सन 1885 पर्यंत 125 प्रतिकृती तयार केल्या. त्या मुंबई, कलकत्ता, लंडन येथे प्रदर्शित केल्या. त्यातील 87 प्रतिकृती जळून खाक झाल्या. वाचलेल्या प्रतिकृतींचा ‘द पेंटिंग्ज इन द बुद्धिस्ट केव्हज ऑफ अजंता’ हा दोन भागांतील खंड प्रकाशित झाला आणि खऱया अर्थाने 16 व्या शतकातील प्रबोधनकालीन श्रेष्ठ भित्तीचित्रकलेच्या दहा शतके आधी त्याच पद्धतीची असामान्य भित्तीचित्रकला परंपरा हिंदुस्थानात, अजिंठय़ात अस्तित्वात आहे हे जगासमोर अधोरेखित झाले.

स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानी सरकारनेही विविध प्रांतांतील रामचंद्रआप्पा बिळगी, एम. एस. चंद्रशेखर, गणेश हलोई, भाऊखंडी, दासगुप्ता यांची नेमणूक करून त्यांच्याकडून प्रतिकृती करून घेतल्या. डॉ. गुलाम याजदानी यांनी अजिंठा भित्तीचित्रांचे छायाचित्रण सर्वेक्षण करून सन 1930 ते 1955 दरम्यान चार खंड निजाम सरकारद्वारा प्रकाशित केले. आज हे खंड सर्वंकष महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. सन 1970 नंतर मारुतराव पिंपरे, विजय कुलकर्णी, प्रा. प्रकाश तांबटकर इ.नी तहहयात अजिंठा चित्रांच्या प्रतिकृतींना वाहून घेतले.

अजिंठा भित्तीचित्रकलेला संरक्षित करण्याचे, त्यांचे पुनर्निर्माण, संवर्धन व सर्वेक्षण करण्याचे महत्कार्य गेल्या दोनशे वर्षांत तत्कालीन ब्रिटिश सरकार, हैदराबादचे निजाम सरकार, हिंदुस्थान सरकार, युनेस्को, जपान सरकार यांसह प्रो. सावामुरा, वॉल्टर एम. स्पिंक, लॉरेन्स बिनियन, विल्यम रोथेन्स्टन, प्रो. लारेंझो सेक्सानी, कार्ल खंडाळवाला, डॉ. एम. के. ढवळीकर, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे इत्यादी महानुभवांनी केलेले आहे. रासायनिक तज्ञमंडळीही अद्ययावत तंत्रज्ञानासह अजिंठय़ात तळ ठोकून आहे. प्रदूषणमुक्त वातावरण रहावे म्हणून अजिंठय़ाच्या पायथ्याशी असलेला वाहनतळ, दुकानेही नजीकच्या फर्दापूर गावाजवळील ‘टी पॉइंट’वर हलवलेली आहेत. तिथेच अलीकडे 1, 2, 16 व 17 या लेण्यांच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत. आतील भित्तीचित्रांचा दर्जा ठीक आहे आणि विशेष म्हणजे तिथे सतत डॉक्युमेंटरी फिल्म सुरू असते. खंत याची की, त्या लेण्या अभावानेच सुरू असतात. मूळचा चित्रकार प्रसाद पवार झपाटल्यागत अजिंठय़ाच्या चित्रांचे कॅमेऱयाच्या सहाय्याने डिजिटल रिस्टोरेशनचे कठीण कार्य करीत आहे, पण गेल्या दोन दशकांपासून येथे चित्रकारांना मुक्तपणे चित्रांच्या प्रतिकृती काढता येत नाहीत. अगदी सरावरेखांकनेही नाही. छायाचित्रांसाठी मात्र विशिष्ट पावती फाडून परवानगी मिळते. चित्रकारांची पेन्सिल, रंग तिथे चालत नाही. यावर सर्वमान्य तोडगा निघाला पाहिजे.

समता, बंधुता, शील, सत्य, अहिंसादी बुद्ध विचारांचा संदेश देणारी, समृद्ध निरोगी जीवनदर्शन घडविणारी अभिजात भित्तीचित्रे प्रदीर्घ काळापर्यंत टिकली पाहिजे. त्याचे वारंवार सर्वेक्षण झाले पाहिजे. या अजरामर कलेला हानी पोहोचविणाऱयांना जागरूक राहून रोखले पाहिजे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निखळ अभिजात कला वारसा म्हणून जपला पाहिजे.

[email protected]