
सामना प्रतिनिधी, नांदेड
येथील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कौठा परिसरातील एक घरातून 28 खंजीर, 1 तलवार आणि 1 अर्धवट तयार असलेली तलवार अशी 30 घातक हत्यारे पकडली आहेत. पकडलेल्या युवकावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक काल दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी रात्री गस्त करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार लगेच कौठा परिसरातील विकासनगर भागाकडे प्रस्थान केले. गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी विकास नगर भागातील किशनसिंग भगवानसिंग बावरी यांचे घर तपासले. त्याठिकाणी ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक (35) ही व्यक्ती भेटली. त्याच्या माहितीनुसार सर्व हत्यारे किशनसिंग भगवानसिंग बावरी याची आहेत. तो फक्त तेथे हत्यारे बनविण्याचे काम करतो.
पोलीस पथकाने तिथून 28 खंजीर,1 तलवार आणि 1 अर्धवट तयार असलेली तलवार अशी 30 घातक हत्यारे आणि 4 तलवार ठेवण्याचे म्यान जप्त केली आहेत. शेख जावेद यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक (35) विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































