विद्युत घोटाळ्यानंतर परभणी मनपाचा शिक्षण घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामान प्रतिनिधी। परभणी

येथील महानगरपालिकेतील विद्युत बील घोटाळ्याचा तपास अपूर्ण असतानाच मनपाच्या शिक्षण विभागातील घोटाळा उघडकीस आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या याद्या बदलून 75 लाख 37 हजार 733 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी यांच्यासह 8 जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी महानगरपालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आश्वासने देऊन काँग्रेसने परभणी महानगरपालिकेची सत्ता हस्तगत केली. आठ दिवसाआड नळाला पाणी देण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. परंतु 16 दिवस उलटले तरी परभणीतील नळांना पाणी येत नाही. त्रस्त नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी पाण्याच्या टाक्यावरील टँकरमाफीयांना बंदी घातली होती. स्वत: टाकीवर जाऊन यांनी टँकरवाल्यांना हाकलून दिले होते. तसेच चोरुन टँकर नेणाऱ्यांना मोठा दंडही लावला होता. तसेच पाण्याच्या टाकीवर सीसी टिव्ही सुद्धा बसविले होते. त्यामुळे पाणी चोरी आणि टँकर माफीयांना आळा बसला होता.

पण आता पुन्हा शहरात टँकरमाफीया सक्रीय झाला असून पाण्याच्या टाकीवर टँकर माफीया बिनधास्तपणे आपले टँकर पाण्याने भरून विक्री करत आहेत.

दोन वर्षापूर्वी परभणीत मनपा आणि विद्युत मंडळाच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मोठा विद्युत बील घोटाळा केला होता. मनपाच्या पैशातून चक्क खाजगी बड्या लोकांची विद्युत बिले भरण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास अजूनही चालू आहे. त्यानंतर आता मनपाच्या शिक्षण विभागात घोटाळा झाला आहे. महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त तथा शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी साहेबराव शेषराव पवार यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात 25 एप्रिल रोजी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. त्यामध्ये मनपातील शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी, लिपीक स. ताजोद्दीन स. युसूफोद्दीन, सुभाष पंडितराव जोशी, फेमस बेकरीचे मालक, सय्यद रफीक शब्बीर (लिपीक ताजोद्दीन यांचे मेहुणे), रेहाना बेगम शब्बीर अली (लिपीक स. ताजोद्दीन यांची पत्नी), मोहम्मद अब्दुल्ला मोहम्मद मकरम, मोहम्मद इलियास मकरम हुसेन या आठ जणांनी 2011 ते जुलै 2015 या कालावधीत संगणमत केले. शिक्षण विभागातील शिक्षकांच्या वेतनाची रक्कम आरटीजीएस झाल्यानंतर ती शिक्षण निधीत जमा करण्याऐवजी दुसरी बनावट यादी तयार करुन त्यामध्ये नातेवाईकांची व खाजगी व्यक्तींची नावे समाविष्ट करुन आयडीबीआय बॅँकेत खाते उघडले व त्या खात्यातून 75 लाख 37 हजार 733 रुपयांच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली. त्यावरुन आठही आरोपींविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.