रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. मुलुंड-माटुंगा आणि वडाळा रोड-मानखुर्द या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते वांद्रे स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिन्ही मार्गांवर ब्लॉकच्या काळात गाड्या उशीराने धावणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉककाळात अप मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल सुमारे 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावतील. ब्लॉकमुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावणार असून याच स्थानकातून ती पुन्हा रवाना होईल.

हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉककाळात हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते वांद्रे स्थानकादरम्यान धीम्या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉककाळात धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळण्यात येणार आहे. विलेपार्ले स्थानकात लोकलला अतिरिक्त थांबा देण्यात येईल, तर राम मंदिर स्थानकात लोकल थोबणार नाहीत. तसेच बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 4 वरील लोकलसेवा बंद असतील.

वांद्रे स्थानकात अप-डाऊन धीमा मार्गावर रविवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणर आहे. या वेळेत सर्व लोकल फेऱ्या मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. खार रोड स्थानकात थांबणाऱ्या लोकलला अतिरिक्त लोकल थांबणार असून माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, महालक्ष्मी या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.