
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वारणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे कारण प्रियंका यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील 41 जागावंर प्रचार करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपल्याला फक्त एकच नाही तर 41 जागांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. या जागांवर पूर्ण ताकदीने उतरून मताधिक्य मिळवण्याची जबाबदारी आपल्याकडे देण्यात आली आहे. त्याशिवाय पक्षाच्या इतर जबाबदाऱ्याही आपल्याकडे आहेत. त्यामुळे एका जागेवर निवडणूक लढवल्यास एकाच मतदारसंघात अडकून पडायला होईल आणि इतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होईल, असे होऊ नये, यासाठीच आपण वासणसीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे प्रियंका यांनी सांगितले.
काँग्रसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वासणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, 25 एप्रिलला या मतदारसंघातून अजय राय निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असल्याने देशाचे लक्ष या मतदरासंघाकडे आहे. त्यामुळे हा मतदारसंघ व्हीव्हीयपी झाला असून याचे महत्त्व वाढले आहे. मात्र, या मतदारसंघातून निवडणूक का लढवली नाही याबाबत प्रियंका यांनी प्रथमच वक्तव्य केले आहे.
वाराणसीहून निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका यांच्यावर सोडला होता. त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रचारासह इतर अनेक जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत एकाच मतदारसंघात अडकून पडणे, त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांचा असल्याचे काँग्रस नेते सॅम पित्रोदा यांनी सांगितले. प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशातील 41 जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातील 26 जागा पूर्वांचलातील आहेत.या जागांवर मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले असून पूर्वांचलात चांगली आघाडी मिळेल अशी अपेक्षा पक्षाला आहे.

























































