
सामना प्रतिनिधी, पुणे
विमानातील तांत्रिक बिघाडामुळे लोहगाव विमानतळाकरून पुणे ते दुबई प्रवास करणाऱ्या 180 नागरिकांना तीन ते चार तास विमानात अडकून बसावे लागले. त्यानंतर प्रवाशांना आठ तासांच्या विलंबाचा मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उड्डाणापूर्वी स्पाईस जेट कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
लोहगाव विमानतळावरून पुणे-दुबईदरम्यान असणाऱ्या विमानाने काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उड्डाण करणे गरजेचे होते, मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तब्बल 180 प्रवासी चार ते पाच तास विमानात अडकले होते. अखेर पहाटे चारच्या सुमारास प्रकाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर विमानाच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान, विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे बहुतांश जणांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात विमानतळावर आंदोलन करीत विमान कंपनीविरुद्ध घोषणाबाजी केली.
अखेर आठ तासांनंतर विमानाने केले उड्डाण
तांत्रिक दुरुस्तीनंतर उड्डाणासाठी विमानाला तब्बल आठ तासांचा विलंब झाला होता. रविवारी 11 वाजता विमानाने दुबईच्या दिशेने उड्डाण करणे अपेक्षित होते, मात्र तांत्रिक बिघाड दुरुस्तीनंतर विमानाने आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुबईकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान उशीर झाल्याने प्रकाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी विमान कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. तसेच विमानतळावरच कंपनीविरुद्ध घोषणाबाजी करून ढिसाळ नियोजनाचा निषेध केला.


























































