
सामना ऑनलाईन । मुंबई
मतदानासाठी वापरण्यात येणाऱया ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो असे ऐकूण आहे. या लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा भाजप जिंकल्यास जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडेल असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला.
ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही तेदेखील बारामतीची जागा जिंकण्याबाबत एकदम धाडसाने बोलतात. त्यामुळे या निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केलेय का, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. याबद्दल मला अधिक खोलात शिरायचे नाही, पण ईव्हीएममधील चिपमध्ये छेडछाड होऊ शकते अशी माहिती काही जणांनी मला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा घटना घडल्याच्या बातम्या होत्या असे पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
शरद पवारांना पराभव दिसू लागलाय!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीचा पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळेच पवार अशी विधाने करीत आहेत. पवरांनी अशी विधाने करण्यापेक्षा अगोदर त्यांनी आपल्या पराभवाची कारणे लिहायला घ्यावीत. याही परिस्थितीत पक्षाचे खासदार निवडून आले तर निवडणूक घोटाळा नाही. पण भाजपचे खासदार निवडून आल्यास ईव्हीएम घोटाळा याला काय म्हणायचं, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ईव्हीएम काँग्रेसनेच आणली आहे. निवडणूक आयुक्त स्वायत्त आहेत. त्यांना न्यायालयच सांगू शकतं. ईव्हीएम बंद करावं आणि लोकांनी हात वर करून मतदान घ्यावं यावर आमचं काही म्हणणं नाही. पण देशाची सिस्टिम नाकारण्याचे उद्योग विरोधकांनी चालवले आहेत. शरद पवार यांनी ईव्हीएमचा घोटाळा म्हणणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागल्यासारखी आहे अशी टीकाही त्यांनी केली.






























































