
सामना प्रतिनिधी । बीड
रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंतीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवलेला दहा एकर ऊस आग लागल्याने भस्मसात झाल्याची घटना बीड जवळील घोसापुरी शिवारात घडली. उभा ऊस जळून खाक झाल्याने दोन शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
बीड जवळ असलेल्या घोसापुरी शिवारात बन्सी वैद्य यांचा चार एकर आणि त्यांचे भाऊ महादेव वैद्य यांचा सहा एकर ऊस गाळप हंगामात कारखान्याकडे न देता जनावरांना चारा आणि रसवंतीसाठी राखून ठेवला होता. हाच ऊस जनावरांना चारा म्हणून वापरला जात होता, मात्र गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये शेजारी असलेला दहा एकर उभा ऊस जळून खाक झाला. ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी शेतकरी सैरभैर झाले होते, मात्र आग विझवण्यासाठी पाणी नव्हते. संपूर्ण ऊस जळून खाक झाल्यानंतरच आग आटोक्यात आली. या दुर्घटनेने वैद्य कुटूंब संकटात सापडले आहे. महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घोसापुरी येथील तलाठी यांनी पंचनामा केला आहे.




























































